राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने विविध मागण्यांसाठी २० आणि २१ फेब्रुवारीला काम बंद आंदोलन पुकारले आहे. दोन दिवसाचा हा संप कर्मचाऱ्यांनी यशस्वी करावा, असे आवाहन कमचारी संघटनेचे सरचिटणीस र.ग. कर्णिक यांनी केले.
संप यशस्वी करण्याच्या उद्देशाने कामगार नेते चंद्रहास सुटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्य कर्मचारी संघटनेच्या पदधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला र.ग. कर्णिक, राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस अशोक थुल, अशोक दगडे, कृष्णराव मसराम, राजू सुरशे, सतीश जोशी आदी उपस्थित होते. राज्य शासन बाह्य़ यंत्रणेकडून कामे करण्याचे तंत्र अवलंबित आहे.  याचा कर्मचारी संघटनेने यापूर्वीच विरोध केला असून सरकारने मात्र दखल घेतली नाही त्यामुळे सरकारचे लक्ष वेधावे म्हणून हा दोन दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. सर्व सामान्यांवर आघात करणारी वाढती महागाई रोखण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, १ नोव्हेंबर  २००५ पासून निवृत्त वेतन योजना रद्द करावी, पीएआरडीए बील मागे घेण्यात यावे, किमान वेतन १० हजार रुपये देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगाचे भत्ते देण्यात यावे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, ३० महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात येणार आहेत