नंदुरबारचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदली विरोधात विविध सामाजिक संघटनांनी तसेच एका महिलेशी झालेल्या छेडछाडीच्या निषेधार्थ माळी महासंघाने शनिवारी पुकारलेल्या बंदमुळे शहरातील दैनंदिन व्यवहार जवळपास ठप्प होते.
राजकीय हस्तक्षेपामुळे बकोरिया यांची झालेली मुदतपूर्व बदली रद्द करावी, अशी आग्रही मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. सलग तीन दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलने सुरू असून शनिवारच्या बंदला आदिवासी महासंघ, लोकसंघर्ष मोर्चा तसेच इतर राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला होता. दुसरीकडे शुक्रवारी सायंकाळी माळीवाडीतील एका महिलेची युवकाने छेड काढली होती.  पोलिसांनी याप्रकरणी संशयिताला अटक केली आहे. या छेडछाडीच्या घटनेच्या निषेधार्थ माळी महासंघाने शनिवारी बंद पुकारला होता.