जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आजपासून प्रकल्प परिसरात ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. माडबन-जैतापूरच्या जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर आणि मच्छीमार नेते अमजद बोरकर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि मच्छीमार सहभागी झाले आहेत.
प्रस्तावित प्रकल्पाचा परिसर भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे येथे तो उभारण्यात येऊ नये, अशी आंदोलकांची मागणी आहे. अणुऊर्जा खात्याच्या स्थान निवड समितीचा पर्यावरणविषयक अहवाल भिकाजी वाघधरे आणि प्रमोद तिवरकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळवला. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकल्पस्थ भूकंपप्रवणेत दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाच्या विभागात असले तरी जास्त धोकादायक अशा चौथ्या क्रमांकाच्या विभागापासून अगदी जवळ आहे. १९८५ ते २००५ या काळात या परिसराला मध्यम व मोठय़ा स्वरूपाचे ९३ भूकंपाचे धक्के बसले आहेत. तसेच प्रकल्प स्थळापासून पाच ते पंधरा किलोमीटर क्षेत्रात डोंगर खचणे, जमिनींना भेगा जाण्याचे प्रकार घडले आहेत. हे धोके लक्षात घेऊन प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर प्रकल्प परिसरात जमावबंदी आदेश येत्या २३ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आला आहे.