तलावात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा गाळात रुतल्याने मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे घडली. लासलगाव-विंचूर रस्त्यावर प्रतापसागर तलाव आहे. या तलावाजवळील मंगल कार्यालयात स्वयंपाकाच्या कामासाठी आलेला राहुल भास्कर गोरडे (१५) हा विंचूरजवळील ब्राह्मणगाव येथे राहणारा विद्यार्थी मंगळवारी दुपारी काम आटोपल्यानंतर मित्रांसमवेत प्रतापसागर तलावात पोहण्यासाठी गेला. कपडे काढून त्याने तलावात उडी मारली; परंतु तो बाहेर आलाच नाही. त्याच्या मित्रांनी तो बुडाल्याचे पाहून आरडाओरड करीत मंगल कार्यालयाकडे धाव घेतली. त्या परिसरातील एकाने त्याच्या घराजवळील मंडळींना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर ब्राह्मणगाव परिसरातील युवक घटनास्थळी आले. प्रतापसागर परिसरात राहणारे बना महाले, दादा बोरसे, पिंटू बोरसे, भाऊराव माळी व राहुलचे मामा रामदास नवले यांनी तलावात शोधकार्य सुरू केले असता राहुलचा मृतदेह दोन तासांनी बाहेर काढण्यात त्यांना यश आले. राहुल हा लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी लासलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.