उत्तराखंडातील देवभूमीत नैसर्गिक आपत्ती आल्याने प्रचंड नुकसान झाले. कोकण किंवा पश्चिम घाटात अतिवृष्टी/ ढगफुटी झाल्यास आपत्तीला कसे तोंड देता येईल, त्याचा प्रकल्प इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मांडून लक्ष वेधले आहे. शिवाय पारंपरिक ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा असे विजेला पर्याय ठरणाऱ्या प्रकल्पांचे सादरीकरण पाहण्यास विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील माध्यमिक व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी मिलाग्रीस हायस्कूलमध्ये भरलेल्या इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शाळा ४७ आणि प्राथमिक ८२ शाळांनी सहभाग घेतला आहे. मिलाग्रीसचे फादर फॅलिक्स लोबो यांनी शाळेत विज्ञान प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना रांगेत प्रदर्शन पाहण्याचे नियोजन केले.
इन्सुली येथील प्राथमिक शाळा नं. २ मधील विद्यार्थिनी धनश्री रामा हवालदार हिने शिक्षक बाबुराव हनुमंत धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरस्थिती नियंत्रण प्रकल्प सादर केला. तो कोकणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
अतिवृष्टी किंवा ढगफुटी झाली तर मोठय़ा प्रमाणात पूर येतो. हा महापूर सामावण्याची स्थिती नदीपात्रात नसल्याने आसपासच्या गावांत पाणी घुसते, त्यामुळे वित्त व जीवितहानीही होते. त्यासाठी नदीला त्याच्या पाण्याच्या क्षेत्रानुसार बंधारे घातले व नदीच्या क्षमतेएवढे पाणी चालू ठेवून उरलेल्या पाण्याचा तात्पुरता साठा केला तर पूरस्थिती कायमस्वरूपी नियंत्रण होऊ शकते. उत्तराखंडातील विध्वंस लक्षात घेतला तर पूरस्थिती नियंत्रण व्यवस्था हवी. कोकण किंवा पश्चिम घाटात आपत्तींना तोंड कसे देता येईल, त्यासाठी विद्यार्थिनीने प्रकल्प सादर करून सर्वाचेच लक्ष वेधले आहे.
स्नायुबलाद्वारे वीजनिर्मिती
बहुपयोगी सायकलद्वारे सांगेली माध्यमिक विद्यालयात अभिषेक अशोक शिर्के या विद्यार्थ्यांने शिक्षक व्ही. सी. ठाकर, आर. पी. सावंत, आर. एच. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प सादर केला आहे. सायकलला जोडलेल्या डायनॅमोमध्ये १२ व्होल्ट एसीचे ३.७ डीसीमध्ये ब्रिनमुळे रूपांतर होते. त्यामुळे मोबाइल चार्ज होणे, सायकलला अधिकची चेन व्हील जोडून मळणी यंत्रही चालवता येते. त्यामुळे विद्युत ऊर्जेला पर्याय म्हणून स्नायुबलाद्वारे वीजनिर्मिती होते.
जलव्यवस्थापन
मांगेली, ता. दोडामार्ग माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी रामदास गवस याने जलव्यवस्थापन प्रकल्प सादर केला आहे. तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाशेजारील या गावातील विद्यार्थ्यांने सुरक्षित खात्रीशीर जलसाठा, बंधारे व त्याचा वापर यासाठी प्रकल्प सादर करून पाण्याच्या वापराचे फायदे स्पष्ट केले आहेत.
ऊर्जा बचत संयंत्र
चराठे प्राथमिक शाळेचा विद्यार्थी गिरीश महेश परब याला शिक्षिका अलका रेगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ऊर्जा बचत संयंत्र प्रकल्प केला. पारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करून ऊर्जेची बचत करणे व सेन्सरचा वापर करून अपारंपरिक ऊर्जास्रोताचा काळजीपूर्वक वापर केल्याने इंधन बचत, स्वयंचलित संवेदक कार्य करीत असल्याने मनुष्यबळाची आवश्यकता नाही. या संयंत्राचा वापर इमारती, कारखाने, कार्यालये या परिसरातील विजेची बचत तसेच महामार्गावरील दिवे अनावश्यक सुरू राहणार नाहीत, यासाठी केला जाऊ शकतो.
सडक्या केळ्यापासून इथेनॉलनिर्मिती
मळेवाड प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी दिव्या विजय चराठकर हिने वृषाली पाटील या शिक्षिकेच्या मार्गदर्शनातून सडक्या केळ्यापासून इथेनॉलनिर्मिती प्रकल्प सादर केला आहे.
इंधनाची समस्या सोडविण्यासाठी त्यामुळे मदत होईल. वाईननिर्मितीसाठी उपयोगी, पेट्रोल-डिझेलमध्ये योग्य प्रमाणात वापर तसेच नेलपॉलीश, परफ्युम, पेंट, कोटिंगमध्ये वापर शक्य आहे, असे अनेक प्रकल्प सादर केले आहेत.