विदर्भातील सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघाल्यानंतर आता खासगी कारखान्यांनाही इतर भागांशी स्पर्धा करणे कठीण झाले असून, आतापर्यंत पाच खासगी कारखान्यांसह एका सहकारी साखर कारखान्याला केवळ ४ लाख टन उसाचे गाळप करणे शक्य झाले आहे. साखरेचा उताराही ९.१५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. पाच वर्षांपूर्वी हंगामात १५ लाख क्विंटलवर साखरेचे उत्पादन घेणाऱ्या विदर्भात यंदा १० लाखांचा टप्पा गाठणे शक्य होईल की नाही, याविषयी साशंकता आहे.
साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सध्या १५५ साखर कारखान्यांमध्ये उसाचे गाळप वेगाने सुरू आहे. ९ जानेवारीपर्यंत २६६ लाख मे.टन ऊस गाळप होऊन २७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. साखरेचा उतारा १०.४४ टक्के आहे. यंदा राज्यात ९४ सहकारी आणि ६१ खासगी कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. त्यात विदर्भाची कामगिरी अदखलपात्र ठरली असून अमरावती विभाग सर्वात तळाशी आहे. या विभागात एका सहकारी आणि एका खासगी अशा दोनच कारखान्यांमध्ये गाळप हाती घेण्यात आले आहे. अमरावती विभागातील या दोन कारखान्यांनी आतापर्यंत १.६१ लाख मे.टन उसाचे गाळप घेऊन १.४९ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. नागपूर विभागात चार खासगी कारखान्यांनी २.२२ लाख मे.टन उसाचे गाळप करून २ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
गेल्या वर्षीच्या हंगामात राज्यात एकूण १५५ साखर कारखान्यांनी ९ जानेवारीपर्यंत ३२७ लाख मे.टन उसाचे गाळप करून ३४५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. उताराही १०.५६ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. यंदा मात्र उताराही कमी आहे आणि साखरेचे उत्पादनही गेल्या वर्षीच्या तुलनेत घटले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत विदर्भातील सहा कारखान्यांनी ४.०७ लाख मे.टन उसाचे गाळप करून ३.५७ लाख क्विंटलपर्यंत साखर उत्पादनातील वाटा उचलला होता. २००७ मध्ये विदर्भात ८ साखर कारखाने सुरू होते. त्यात सहकारी कारखान्यांची संख्या अधिक होती, पण पाच वर्षांतच स्थिती उलट झाली असून सुरू असलेल्या कारखान्यांपैकी केवळ एका सहकारी कारखान्याचे अस्तित्व उरले आहे. पाच वर्षांपूर्वी आठ कारखान्यांनी १५ लाख क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन घेतले होते. हळूहळू साखर कारखाने बंद पडत गेले. आता साखरेचा वाटा नगण्य आहे.
विदर्भात ऊस लागवडीचे क्षेत्र झपाटय़ाने कमी झाले आहे. खासगी कारखान्यांनी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी शेतकऱ्यांना संधी दिली असली, तरी शेतकऱ्यांना आता ऊस लागवडीत रस उरलेला नाही, हे चित्र आहे. सहकारी साखर कारखाने उघडणाऱ्या विदर्भातील नवसाखरसम्राटांनी मोठी स्वप्ने रंगवली होती, पण या स्वप्नांची पूर्तता करणे त्यांना शक्य झाले नाही. एक-दोन हंगामातच बरेचशे कारखाने बंद पडले व नंतर अवसायानात काढले गेले आणि कारखान्यांची यंत्रसामुग्री, जागा बेभाव विकण्यात आली. सहकारी तत्त्वावर कारखानदारी विकसित करण्याचे उद्दिष्ट दूरच राहिले. शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका सहन करावा लागला. साखरेचा कमी उतारा ही विदर्भातील कारखानदारीची मोठी समस्या आहे. पाच वर्षांपूर्वीच्या हंगामात आठ कारखान्यांचा उतारा १०.२ टक्के निघाला होता. यंदा तो ९.१५ टक्क्यांपर्यंत आला आहे. इतर विभागांच्या तुलनेत अमरावती आणि नागपूर विभागात उतारा सातत्याने कमी आहे.