अवेळी झालेल्या गारांच्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्य़ात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वसमत तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी गोविंदा आत्माराम डाढहाळे यांनी शेतात विष घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी गोविंदा शेतावर गेला होता. तेथेच त्याने विषारी औषध घेतले. आजुबाजूच्या शेतकऱ्यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी वसमत येथील रुग्णालयात गोविंदा यांना हलविले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
पार्डी येथे गोविंदा डाढहळे यांची ६ एकर जमीन होती. वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या मुलीचा विवाह ठरवला होता. २ मे रोजी लग्नाची तारीख ठरली होती. मुलीच्या लग्नासाठी लागणारी रक्कम आणि शेतीमुळे झालेल्या कर्जामुळे गोविंदा वैतागले होते. अन्य एका घटनेत सेनगाव तालुक्यातील बाभळगाव येथील राजाराम जहेराव (वय ६२) या शेतकऱ्यानेही आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची ३ एकर जमीन होती. गारपिटीमुळे सगळेच पीक वाया गेल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
लातूरमध्ये आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
वार्ताहर, लातूर
गारपिटीमुळे मुलीच्या विवाहाची चिंता वाढल्याने औसा तालुक्यातील कार्ला येथील ईश्वर रंगराव पाटील (वय ५०) या शेतकऱ्याने शनिवारी रात्री ८ वाजता विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलीच्या लग्नासाठी ईश्वर पाटील यांना आíथक चणचण जाणवत होती. त्यात गारपीट झाल्याने हातचे पीक गेले. त्यामुळे पैसे कोठून आणायचे, हा प्रश्न निर्माण झाला. ईश्वर पाटील यांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. पैशाची एवढी निकड होती, की आपली शेती विकण्यासाठी त्याने जाहिरातही दिली होती. मात्र, शेतीला गिऱ्हाईक आले नाही. त्यामुळे मुलीचे लग्न कसे करायचे, या चिंतेत तो होता. शनिवारी मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर त्याच रात्री त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2014 रोजी प्रकाशित
गारपिटीचे दुष्टचक्र थांबता थांबेना; हिंगोली जिल्ह्य़ात दोन आत्महत्या
अवेळी झालेल्या गारांच्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्य़ात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वसमत तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी गोविंदा आत्माराम डाढहाळे यांनी शेतात विष घेऊन आत्महत्या केली.

First published on: 24-03-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of two farmer in hingoli