कोकणात भाडोत्री गुंडांनी कॉंग्रेसची प्रतिमा डागाळल्याचा घणाघाती आरोप करीत शिवसैनिकांवर लाठीमार करणाऱया पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.
शिवसेना-पोलीस आमनेसामने
कणकवली येथे शिवसैनिक व पोलिसांमध्ये आमने-सामने झालेल्या राडय़ातील जखमी शिवसैनिकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे कणकवलीमध्ये आले आहेत. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी नाव न घेता उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर कडाडून टीका केली. शिवसैनिकांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी आपण इथे आलो असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, कणकवलीमध्ये झालेल्या राड्यात कॉंग्रेसने पोलीसांचा वापर करून घेतला. ज्यांनी ज्यांनी सुपारी घेऊन शिवसैनिकांवर लाठीमार केला. त्यांचा आम्ही नुसता निषेध करणार नाही. त्यांच्याविरुद्ध लढणार. दिल्लीत आणि राज्यात लवकरच भगवा फडकणार आहे. आम्हीसुद्धा अन्याय करणाऱया पोलीसांची काळी यादी तयार करतो आहोत. सत्ता मिळाल्यावर त्यांना योग्य उत्तर दिले जाईल. गृहमंत्री आबांनी नुसता आपल्या तोंडाचा डबा न वाजवता पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
हा केवळ राजकीय लढा नसून, कोकणी जनतेच्या विकासाचा लढा आहे. तो जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.