IPL 2024 च्या साखळी फेरीतील आतापर्यंतचा प्रत्येक सामना रंजक ठरला. शनिवारी चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ही महत्त्वाची लढत चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आली. या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला प्लेऑफ गाठण्याची संधी होती. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून समस्त क्रिकेटप्रेमींचं लक्ष या सामन्याकडे लागलं होतं. अखेर या अटीतटीच्या लढतीत विराट कोहलीच्या आरसीबी संघाने बाजी मारत चेन्नईवर २७ धावांनी विजय मिळवला आणि प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
आरसीबी संघ आणि विराट कोहलीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे RCB च्या विजयानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. मराठी कलाकारांनी सुद्धा खास पोस्ट शेअर करत या आरसीबीच्या संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने या सामन्याबाबत फक्त एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
IPL 2024 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये RCB ने खराब कामगिरी करत पराभवांची रांग लावली होती. परंतु, त्यानंतर या टीमने जोरदार पुनरागमन केलं. सर्व संघांना मागे टाकत अखेरच्या क्षणाला प्लेऑफचा प्रवेश निश्चित केला. फाफ डू प्लेसिसच्या संघाचा हा सलग सहावा विजय आहे. अगदी शेवटच्या क्षणाला प्लेऑफ गाठल्यामुळे गौरवने “बाजीगर…” अशी पोस्ट शेअर करत पुढे विराट कोहलीला टॅग केलं आहे.
हेही वाचा : २५ दिवसांनी घरी परतलेल्या गुरुचरण सिंगचा बदललाय लूक, ओळखणंही झालं कठीण; पाहा पोलिसांबरोबरचा पहिला फोटो
गौरवची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. त्याच्याप्रमाणे रुचिरा जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील RCB च्या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आरसीबीच्या संघाने चेन्नईला २१९ धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला २०० पेक्षा कमी धावसंख्येवर रोखावं लागणार होतं. अखेर या लढतीत चेन्नईला १९१ धावांवर रोखून RCB ने २७ धावांनी विजय मिळवला.
हेही वाचा : कार अपघातात अभिनेत्री पवित्रा ठार, बचावलेल्या अभिनेत्याने घेतला गळफास; शेवटच्या पोस्टमध्ये लिहिलं, “दोन दिवस वाट…”
दरम्यान, गौरव मोरेबद्दल सांगायचं झालं तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून एक्झिट घेतल्यावर आता सध्या अभिनेता एका नव्या हिंदी कॉमेडी शोमध्ये झळकत आहे. याशिवाय गौरव येत्या काळात अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे.