शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासंबंधी रत्नागिरी नगर परिषदेच्या निर्णयाला आपला पूर्णत: पाठिंबा राहील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले. बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत मुंबईत सुरू असलेला वाद रत्नागिरीत होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याबाबत मुंबईत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. हे स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे असे काहींचे म्हणणे आहे. तर इंदू मिल व कोहिनूर मिलच्या जागेवर स्मारक उभारण्यास यावे, अशी मागणी काहींनी केली आहे. मात्र याबाबत शिवसेनेने आपला अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, नगररचना कायद्यात अलीकडेच केलेल्या बदलाचा संदर्भ देत मैदानात बांधकाम करता येणार नसल्याचे सांगतानाच स्मारक बांधता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मुंबईत सुरू असलेल्या नियोजित स्मारकाबाबतचा वाद रत्नागिरीत होणार नाही, अशी ग्वाही आ. सामंत यांनी यावेळी दिली.
रत्नागिरी शहरात शिवसेनाप्रमुखांचे यथोचित असे भव्य स्मारक व्हावे, अशी आमची इच्छा आहे. याबाबतचा निर्णय रनपमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप युतीने घ्यावयाचा असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला माझा व्यक्तिश: तसेच रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा राहील. हे स्मारक उभारताना ते शिवसेनाप्रमुखांनी केलेल्या सामाजिक, राजकीय आणि मराठी माणसाच्या हितासाठी दिलेल्या लढय़ाची आठवण करून देणारे अप्रतिम स्मारक असावे, असेही ते म्हणाले.
रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेनाप्रमुखांचे यथोचित स्मारक उभारण्यात यावे, असे सेना नगरसेवकांनी सूचित केले. नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शिवसेनाप्रमुखांच्या स्मरणार्थ एक भव्य कलादालन सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेला रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष गजानन पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबू म्हाप आदी उपस्थित होते.