नाशिकहून अल्पवयीन मुलीस पळवून आणून जबरदस्तीने देहविक्रीस भाग पाडणाऱ्या सर्व संशयितांना अटक करण्यास पोलिसांना अद्याप यश आले नसताना, या प्रकरणाचा निषेध आणि संशयितांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवरच पोलिसांकडून झालेल्या दडपशाहीचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.
नाशिकच्या अल्पवयीन मुलीला धुळ्यात डांबून ठेवत बेबीबाई चौधरी हिच्यासह नऊ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी बेबीबाईसह व्यापारी सचिन अग्रवाल व नाशिक येथील सपना पाटील यांना अटक केली आहे. प्रत्यक्षात नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असताना केवळ तीनच संशयितांना अटक झाली आहे. अन्य संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील महिला संघटनांनी आवाज उठविला आहे. सर्वपक्षीय महिलांच्या वतीने शनिवारी मोर्चाही काढण्यात आला. संशयितांना त्वरित अटक न झाल्यास सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर महिला एकत्र आल्या. त्यामध्ये बहुतेक महिला प्रतिष्ठित घरांमधील होत्या. सनदशीर मार्गाने निदर्शने सुरू होताच शहर पोलीस ठाण्याची सूत्रे अलीकडेच हाती घेतलेले निरीक्षक दीपक कोळी यांनी ‘उचला रे या महिलांना, टाका आतमध्ये’ अशी भाषा वापरत कारवाईस सुरुवात केली. त्यांच्या या असभ्य भाषेमुळे महिला अधिकच संतप्त झाल्या. उच्चशिक्षित महिला आंदोलकांसमोर अशी भाषा वापरणाऱ्या कोळी यांचा निषेध होऊ लागला आहे.