भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याची अनेक वर्षांची धारणा आहे. मात्र आसाम राज्याने केलेल्या एका दाव्यामुळे आता जोरदार वाद उफाळला आहे. सहावं ज्योजिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. तशी जाहीरात आसामच्या पर्यटन विभागाने काढली आहे. या जाहीरातीवर आता राज्यातून जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “घटनाबाह्य ED सरकार – आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही.” अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टिकस्र सोडले.

हे वाचा >> “गुजरातचे उद्योगांवर आक्रमण आणि आसामचे देवधर्मावर..”; संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री आतातरी…”

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!”, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

आणखी ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील भीमाशंकर येथील मंदिराचा पूर्वइतिहास सांगितला. “श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते. अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरूय केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार आहे. श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही. आता आणखी कुणाची साक्ष हवी?”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी. या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.