पालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणात सुमारे सव्वा वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले मुख्य संशयित आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज  जिल्हा न्यायालयाने मंगळवारी पुन्हा एकदा नामंजूर केला. जामिनासाठी उच्च न्यायालयात ते अर्ज दाखल करू शकणार असले तरी जळगाव महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांचे तुरुंगाबाहेर येणे अशक्य म्हटले जात आहे.
जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मागे घेऊन जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्या. एन. आर. क्षीरसागर यांनी जामीन नाकारल्याने जैन समर्थक व हितचिंतक कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला. पालिकेच्या कोटय़वधींच्या घरकुल घोटाळा प्रकरणात १० मार्च २०१२ रोजी जैन यांना अटक करण्यात आली. प्रारंभीचे नऊ दिवस त्यांनी पोलीस कोठडीत काढले. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर ते एकही दिवस कोठडीत राहिले नाहीत. वैद्यकीय कारणास्तव ते लगेच रुग्णालयात दाखल झाले. त्यांना रूग्णालयात मुक्काम ठोकून सुमारे सव्वा वर्ष पूर्ण झाले आहेत.
यादरम्यान जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी त्यांचे जामीन अर्ज फेटाळले. जैन यांचा तात्पुरता जामीन अर्ज दोन जुलै २०१२ रोजी जिल्हा न्यायालयाने फेटाळला.
त्यानंतर नियमित जामीन अर्जही जिल्हा न्यायालयाने ३० जुलै २०१२ रोजी नामंजूर केला. १३ सप्टेंबर २०१२ रोजी उच्च न्यायालयाने, १८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय तसेच १७ डिसेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले. सहा फेब्रुवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा जामीन नाकारला. सध्या जैन यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.