राजकीय भवितव्य पणाला
राज्य व केंद्रात अनेक वर्षे सत्तेच्या राजकारणात कार्यरत राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना स्वत:चे घर असलेली महापालिकेची सत्ता टिकविता आली नाही. लोकसभा ते महापालिकेपर्यंतपर्यंतची पराभवाची उतरती कळा पाहता सुशीलकुमारांची राजकीय सद्दी समाप्त होण्यातच जमा असल्याचे मानले जात आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीत मानहानिकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षात निर्माण झालेले नैराश्य झटकण्यासाठी शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे कामाला लागल्या आहेत. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचेही आमदारपद कितपत शाबूत राहील, यााबद्दलही प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात तब्बल नऊ वर्षे अर्थसंकल्प मांडणाारे मंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाने विक्रम नोंदविला गेला आहे. १९८०-८२ चा अपवाद वगळता १९७४ पासून ते सलग राज्याच्या मंत्रिमंडळात महत्वाची खाती सांभाळणारे व नंतर मुख्यमंत्री होऊन परत राज्यपाल झालेले शिंदे हे पुढे केंद्राच्या मंत्रिमंडळात ऊर्जा व नंतर गृहखाते सांभाळत पुढे तर थेट लोकसभेचे नेते झाले. युनोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय सरचिटणीस अशी किती तरी जबाबदाऱ्या शिंदे यांनी पेलल्या आहेत. सोलापूरच्या न्यायालयातील सामान्य पट्टेवाला ते थेट देशाचा गृहमंत्री अशी देदीप्यमान वाटचाल करणारे सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय आलेख जसा उंचावत गेला, तसा तो काही वर्षांतच एका मागोमाग एक घटनांनी खालावतही गेला. आता तर त्यांची सद्दीच संपल्यात जमा आहे.
यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आलेले सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या स्वत:च्या सोलापुरात कधीही स्वत: पक्षाची संघटना बांधली नाही. त्यासाठी ते आपले दिवंगत सहकारी विष्णुपंत कोठे यांच्यावर सदैव अवलंबून राहिले. १९७८ सालच्या विधाानसभा निवडणुकीपासून ते २००४ सालच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येकवेळी शिंदे यांच्या निवडणुकांची जबाबदारी कोठे हेच सांभाळत होते. ‘कोठे यांनी बोलावे अन् शिंदे यांनी ऐकावे’ असे समीकरणच ठरले होते. पुढे कोठे यांची राजकीय महत्वाकांक्षा बळावली आणि त्यातूनच उभयतांमध्ये बिनसले गेले. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शेिंदे यांना दारूण पराभव पत्करावा लागला. नंतर शिंदे व कोठे यांच्यात चांगलाच दुरावा निर्माण झाला आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांच्यातील युध्दाला तोंडच फुटले. त्यावेळी शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कोठे यांचे पुत्र महेश यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आव्हान उभे केले. त्यातून तावून सुलाखून निघालेल्या प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला खरा; परंतु एकू्ण शहराचे राजकारण सांभाळण्याचे कौशल्यच शिंदे यांच्याकडे नसल्याने त्याचा फटका शिंदे यांना बसत गेला. परिणामी यंदाच्या महापालिका निवडणुकीत धोरण ठरविताना व डावपेच आखताना स्थानिक पक्षश्रेष्ठींकडून अनेक चुका झाल्या. यशाचे वाटेकरी सारेजण असतात. परंतु पराभवाचे वाटेकरी कोणी नसतात.
या पाश्र्वभूमीवर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विजयी नगरसेवक व पराभूत उमेदवारांना भेटून त्यांचे मनोगत आमदार प्रणिती शिंदे जाणून घेत आहेत. त्यातून पक्षात आलेले नैराश्य झटकून देण्याचा व पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. मात्र, पक्षाला पराभव पत्करावा लागण्यामागची अनेक कारणे असून त्याची जबाबदारी निश्चित करताना शिंदे कुटुंबीयांच्या दिशेनेच अंगुलीनिर्देश केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व कांग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यात सोलापुरात दोन्ही कांग्रेसची आघाडी करण्यावर एकमत झाले होते. परंतु त्यात स्थानिक पातळीवर खोडा घातला गेला, त्याचा दोष आमदार प्रणिती शिंदे यांना दिला जातो. यात सुशीलकुमारांची यांची हतबलता दिसून येते.पालिका निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेससाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या एमआयएमचे जिल्हा प्रभारी तौफिक शेख यांना काँग्रेसमध्ये- स्वगृही आणण्याचे प्रयत्न सुरू होते.एवढेच नव्हे तर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनाही पुन्हा कांँंग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यादृष्टीने हालचाली वाढल्या असतानाच स्थानिक काँग्रेस पक्षावर पकड असलेल्या नेत्यांच्या घरातूनच आडकाठी आणली गेली, कोठे व शेख यांचा काँग्रेस प्रवेश झाला असता तर पालिका निवडणुकीचे चित्र कदाचित वेगळे पाहायला मिळाले असते, असे आजही काँँंग्रेस वर्तुळात कुजबुजीच्या स्वरूपात चर्चा ऐकायला मिळते. महेश कोठे व तौफिक शेख हे दोघेही तसे मुळात काँग्रेसचेच.शिवसेनेने २१ जागा व एमआयएमने ९ जागा हिसकावून घेताना कोठे व शेख यांनी काँग्रेसचा दारूण पराभव होण्यास महत्वाचा वाटा उचलला आहे. महेश कोठे यांचे वडील दिवंगत विष्णुपंत कोठे हे आज जर हयात असते तर पालिकेच्या या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या जागांमध्ये आणखी घट होऊन त्या एक अंकावरच मिळाल्या असता. म्हणजे कदाचित एमआयएमपेक्षा कमी जागा कांँग्रेसच्या पदरात पदरात पडल्या असत्या, हे काँग्रेसच्या वर्तुळात सारेजण मान्य करतात.
- २००४ साली शिंदे हे मुख्यमंत्री असताना सोलापूर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा झालेला पराभव शिंदे यांच्या जिव्हारी लागला. लौकिक अर्थाने तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय उतरंडीला सुरूवात झाल्याचे मानले जाते.
- गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शेंदे यांना दारूण पराभव पत्करावा लागला. नंतर शिंदे व कोठे यांच्यात चांगलाच दुरावा निर्माण झाला आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांच्यातील युध्दाला तोंडच फुटले. त्यावेळी शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कोठे यांचे पुत्र महेश यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आव्हान उभे केले.
- पालिका निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेससाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या एमआयएमचे जिल्हा प्रभारी तौफिक शेख यांना काँग्रेसमध्ये- स्वगृही आणण्याचे प्रयत्न सुरू होते. पण त्यास यश आले नाही.
- महेश कोठे व तौफिक शेख हे दोघेही तसे मुळात काँग्रेसचेच. या दोघांनी शिंदे कुटुंबीयांना धडा शिकविण्यासाठी किंबहुना आपली ‘औकात’ दाखविण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. यात त्यांना अपेक्षित यशही आले.
नेतृत्व पोकळी
- सोलापुरात कॉंग्रेस पक्षात निवडणुकांची नीट नेटकी जबाबदारी सांभाळू शकणारे व तद्अनुषंगाने गल्लीबोळातील भौगोलिक, राजकीय व सामाजिक स्थितीची इत्यंभूत माहिती असलेले नेतृत्वच दिसत नाही.
- पक्षात अस्तित्वात असलेल्या समन्वय समितीत जी नेतेमंडळी आहेत, त्यापैकी अनेकांचा जनाधार केव्हाच तुटला आहे. काही नेत्यांना तर शेजारपाजारचेही कोणी विचारत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यातच पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा ज्यांच्या खांद्यावर देण्यात आली, ते सुधीर खरटमल यांचा पिंडच राजकीय नाही.
- एकूणच अपरिपक्व वातावरणात पालिका निवडणुकांना सामोरे जाताना काँग्रेसमध्ये उमेदवार निश्चित करण्यापासून ते पक्षाचे जाळे मजबूत करण्यापर्यंत योग्य राजकीय डावपेच किंवा लाभदायक धोरण आखता आले नाहीत. यात शिंदे यांच्यापुढे पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे आव्हान आहे. त्यांचे वय, पक्षातील स्थान पाहता त्यांची वाट अधिक बिकट झाल्याचे मानले जाते.