सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांची लढत चुरशीची होत असताना प्रचाराबरोबरच राजकीय डावपेचही आखले जात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपचे दिवंगत माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या निवासस्थानी घेतलेली धाव आणि त्यावेळी भाजपमधील असंतुष्ट मंडळींशी घेतलेली भेट हा चर्चेचा विषय ठरला आहे.

लिंगराज वल्याळ हे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पहिले आमदार होते. ते १९९० साली सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. नंतर १९९५ साली पुन्हा दुसऱ्यांदा ते आमदार झाले असता पुढच्याच वर्षी, १९९६ साली मध्यावधी लोकसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी वल्याळ हे भाजपकडून निवडून आले होते. सोलापुरातील भाजपचे ते पहिलेच आमदार आणि पहिलेच खासदार होते. त्यांचे पुत्र नागेश वल्याळ हे भाजपचे नगरसेवक होते. परंतु सध्या ते भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना लिंगराज वल्याळ यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत वल्याळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

हेही वाचा…सांगली: मविआतील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी दबावाचे राजकारण

यावेळी भाजपमध्ये असंतुष्ट समजले जाणारे सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्यासह वल्याळ यांच्याबरोबर १९८५ ते १९९० पर्यंत महापालिका सभागृहात राहिलेले प्रभाकर जामगुंडे, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले प्रा. अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते. यावेळी सुशीलकुमारांचे स्वागत करण्यात आले. यासंदर्भात बोलताना त्यांनी यात कसलेही राजकारण नसल्याचा खुलासा केला.