"नारायणराव, त्याच सोनियांच्या पायावर १० वर्षे लोटांगण घालत तुम्ही..", सुषमा अंधारेंचा हल्लाबोल | Sushma Andhare verbal attack on Narayan Rane in Dasara Melava mentioning Sonia Gandhi | Loksatta

“नारायणराव, त्याच सोनियांच्या पायावर १० वर्षे लोटांगण घालत तुम्ही..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी (५ ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सडकून टीका केली.

“नारायणराव, त्याच सोनियांच्या पायावर १० वर्षे लोटांगण घालत तुम्ही..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
नारायण राणे, सोनिया गांधी व सुषमा अंधारे

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी (५ ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर सडकून टीका केली. “जे नारायण राणे शिवाजी पार्कवर सोनियांचे विचार ऐकायचं का असं म्हणतात, ते नारायण राणे याच सोनियांच्या पायावर १० वर्षे लोटांगण घालत होते,” अशी घणाघाती टीका सुषमा अंधारेंनी केली.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “नारायणराव, आम्हाला तुमच्या दोन वाह्यात बाजार बुणग्यांवर बोलायचंच नाही. पण, नारायण राणे तुम्ही शहाणेसुरते आहात. तुम्ही म्हणावं हिंदुत्वासाठी, तुम्ही म्हणावं की शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचे विचार ऐकायचे आहे का? विसरलात का नारायणराव, त्याच सोनियांच्या पायावर लोटांगण घालत गेली १० वर्षे तुम्ही आमदारकी, खासदरकी, महसूलमंत्री अशी पदं भोगली. तुम्ही शेंड्यावर शहाणं होऊन सांगायचं का आम्हाला.”

“रामदास कदमांनी राष्ट्रवादीत जाण्याची धमकी देत शिवसेनेला ब्लॅकमेल केलं”

“रामदास कदमांनी दोन ते तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची धमकी देत शिवसेनेला ब्लॅकमेल केलं. तेव्हा तुम्ही तुमचं हिंदुत्व कुठे गहाण ठेवलं होतं? अरं आम्ही काय बगलेत रेडिओ ठेवतो की धोतरावर इन करतो की आमच्या कानात बिडी आहे. आम्हाला काही कळत नाही की काय, म्हणे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी टोला लगावला.

“उद्धव ठाकरेंनी हिंदू धर्म सोडून इतर धर्माचा त्याग केला का?”

“उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं? त्यांनी हिंदुत्व सोडलं म्हणजे हिंदू धर्म सोडून इतर धर्माचा त्याग केला का? उद्धव ठाकरे यांनी नुपूर शर्मांप्रमाणे चिल्लर आणि थिल्लर भाषा केली नाही ही त्यांची चूक आहे का?” असा सवालही अंधारे यांनी केला.

“हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथात इतर धर्मांचा द्वेष करायला सांगितलंय”

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “मिंधे गटातील तमाम लोकांनी आणि त्यांचा म्होरक्या आणि कळसुत्री बाहुल्यांचा सूत्रधार असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अंतःकरणावर हात ठेवावा आणि ज्या परमेश्वराला तुम्ही मानता त्याची शपथ घेऊन सांगा की, हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथात, श्रुतीत, पुराणात, वेदात खरा हिंदू होण्यासाठी इतर धर्मांचा कट्टर द्वेष केला पाहिजे असं सांगितलंय.”

हेही वाचा : Photos : आनंद दिघेंची संपत्ती कुणाच्या नावावर ते बापाला विकण्याचा आरोप, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील २० महत्त्वाचे मुद्दे, वाचा…

“तुम्ही हिंदू धर्मावर कलंक आहात. कारण कुटुंब संकटात असताना हिंदू माणूस पळून जात नाही. हिंदू माणूस कुटुंब संकटात असताना एकमेकांना आधार देतो,” असंही अंधारेंनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-10-2022 at 12:54 IST
Next Story
“सोनं नाही भंगार…” उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाच्या प्रसाद लाड यांची टीका, म्हणाले “अमित शाहांवर टीका करण्याइतकी उंची नाही”