इतिहासात प्रथमच तिघांनी वाढविला यवतमाळ जिल्ह्याचा लौकिक

नितीन पखाले, यवतमाळ

वडील काळी-पिवळी वाहन चालक, घरची परिस्थिती बेताचीच. पण त्याने अभ्यासाची जिद्द सोडली नाही. बारावीच्या परीक्षेत तो जिल्ह्यात प्रथम आला. तेव्हाच त्याने प्रशासकीय सेवेत जाण्याचा निश्चय केला आणि मंगळवारी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात त्याचे स्वप्न पूर्ण झाले. यवतमाळच्या रचना कॉलनीतील अजरोद्दिन जहिरोद्दिन काजी याची ही यशोगाथा जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी ठरली आहे.

जिल्ह्याच्या इतिहासात यावेळी प्रथमच तीन विद्यार्थ्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. यवतमाळचा अजरोद्दिन काजी याने देश पातळीवर ३१५ वी रँक, वणी येथील अभिनव प्रवीण इंगोले याने ६२४ वी तर याच तालुक्यातील शिरपूर येथील सुमित सुधाकर रामटेके याने ७४८ वी रँक मिळवून यवतमाळचा गौरव वाढवला. अजरोद्दिन काजी हा यवतमाळच्या रचना कॉलनीतील राहतो. त्याचे वडील काळी-पिवळी वाहन चालक होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही अजरोद्दिनने २००६ मध्ये बारावीची परीक्षा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. पदवीधर झाल्यानंतर बँकेत नोकरी लागली. मात्र प्रशासकीय सेवेत जायचे असल्याने ती सोडून दोन वर्षे दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. आर्थिक अडचणी असताना वडील आणि घरच्या मंडळींनी मोलाचा हातभार लावला. परीक्षेच्या आधी टीव्ही पाहणे बंद केले होते. मात्र पुस्तकं आणि मोबाईलचा अभ्यासात फायदा झाल्याचे त्याने सांगितले.

वणी येथील अभिनव इंगोले याचे वडील शिक्षक असल्याने घरात सुरुवातीपासूनच शैक्षणिक वातावरण होते. त्याचे प्राथमिक शिक्षण वणी येथील विवेकानंद विद्यालयातून झाले. तो इय्यता दहावीमध्ये गुणवत्ता यादीत झळकला होता. मराठी या विषयात महाराष्ट्रात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने त्याला ग.दि. माडगूळकर पुरस्कार मिळाला होता. बारावीनंतर सांगली येथून इंजिनिअरिंग पदवी मिळवली. मात्र प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हायची जिद्द मनात ठेवून त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. तब्बल सात वेळा अपयश मिळाल्यानंतर अखेर त्याने अपेक्षित यश प्राप्त केले. मुंबई येथे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया येथे नोकरी करीत असताना त्याच जोमाने त्याने परीक्षेची तयारी सुरू ठेवली. ओबीसी प्रवर्गातून तो देशातून ६२४ वा आला आहे. अभिनवची बहीण अंकिता ही आयुर्वेदामध्ये पीएचडी करीत आहे, तर. आई प्राची या गृहिणी आहेत.

वणी तालुक्यातील शिरपूरसारख्या गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या सुमित रामटेके याने दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केले. त्याचे वडील सुधाकर हे शिरपूर येथील गुरुदेव विद्यालयात परिचारक होते. सुमितने शिरपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. वणी येथील जनता विद्यालयात बारावी केल्यानंतर आयआयटी वाराणसी येथून बी.टेक. ची पदवी प्राप्त केली. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काही काळ नोकरीही केली. मात्र सुमितला प्रशासकीय सेवेत जायचं असल्याने नागपूर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याला पहिल्याच प्रयत्नात यशही मिळाले. भारत सरकारच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस बलात असिस्टंट कमांडन्टपदी त्याची निवड झाली. मात्र तो रुजू झाला नाही. त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्धार केला व पुणे गाठले. रोज नियमित १० ते १२ तास अभ्यास केला. वाचनासोबतच प्रश्न पत्रिका सोडवण्यावर अधिक भर दिल्याचे सुमितने सांगितले. अनुसूचित जाती प्रवर्गातून त्याने देशात ७४८ वी रँक प्राप्त केली.

आपल्या यशात आई ज्योत्स्ना रामटेके यांचा मोठा वाटा असल्याचे तो सांगतो. अभियांत्रिकी पदविका असूनही त्याच्या आईने गावात शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेले हे तिन्ही विद्यार्थी सामान्य कुटुंबातील आहेत. या तिघांच्या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.