शुल्क माफीसह दहा सवलती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत जाहीर केल्या. केंद्र शासनाकडून मदत मिळाली नाही तरी टंचाईग्रस्तांसाठी एकही पैसा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दुष्काळासंदर्भात चर्चेला त्यांनी आज सभागृहात उत्तर दिले. जमीन महुसलात सूट, सरकारी कर्जाचे पुनर्घटन, वीज बिलात ३३ टक्के सूट, रोजगार हमी योजनांच्या कामांच्या निकषात बदल, मनरेगात अधिक कामांचा समावेश, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, शेतीशी निगडीत कर्जाना स्थगिती, टँकर अथवा बैलबंडीने पाणी पुरवठा, पिण्याच्या पाण्यास अग्रहक्क, विजेचे कनेक्शन तोडू नये, तोडली असल्यास जोडून देणे आदी दहा सवलती पतंगराव कदम यांनी जाहीर केल्या. ते म्हणाले, राज्यात सातत्याने दुष्काळ पडत आहे. ज्या गावात गेल्यावर्षी दुष्काळ पडला त्या गावात पुन्हा दुष्काळ पडला. येत्या काही महिन्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यास तोंड देण्यासाठी उपाय योजना केली जात आहे. प्रत्येक जनावराला पाणी व चारा हे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर छावण्या उघडल्या. मोठय़ा जनावराला ८० रुपये व लहान जनावराला ४० रुपये दर दिला. पंचायत समिती गणात टप्प्याटप्प्याने अधिक प्रमाणात छावण्या उघडण्यास परवानगी दिली आहे. नाशिक जिल्ह्य़ात २०५३, पुणे जिल्ह्य़ात १ हजार २८३, औरंगाबाद जिल्ह्य़ात २ हजार ८९४ गावांसह राज्यात एकूण ६ हजार २५० गावांमध्ये ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी आहे. ८४९ गावे व १ हजार ६४ वाडय़ांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. १३ जिल्ह्य़ात १ हजार २१० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ३३५ छावण्यांमध्ये २ लाख ६६ हजार ११६ जनावरांना आश्रय देण्यात आला आहे, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर अंतिम आणेवारी ३१ डिसेंबपर्यंत घोषित केली जाणार आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीत गैरप्रकार करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असे पतंगराव कदम यांनी निक्षून सांगितले. दुष्काळी भागातील वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश देण्यात आले असून तोडल्यास ती पुन्ना जोडण्याचेही आदेश आहेत. केंद्र शासनाने ५७२ कोटी रुपये मदत दिली असून आणखी मदत मिळणँार आहे. आपण त्यावर अवलंबून नाही. टंचाईग्रस्तांसाठी एकही पैसा कमी पडू दिला जाणार नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले.
रोजगार हमी योजनेच्या कामावर एक लाख मजूर असून १६ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. यंदा २७५ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत, असे रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. पाणी पुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे म्हणाले, गरज भासेल तेवढय़ा टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. चांगल्या कूपनलिका, चांगल्या विहिरी अधिग्रहित करण्याचे आदेश आहेत. पाणी पुरवठा योजना बंद राहणार नाहीत. भूजल सव्र्हेक्षण यंत्रणेतील सेवानिवृत्तांची गरज भासल्यास मदत घेतली जाईल. राज्यातील १५-१६ महापांलिकांमध्ये पाणी गळतीचे मोठे प्रमाण असून सर्वानाच पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे, असे ढोबळे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2012 रोजी प्रकाशित
राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी दहा सवलती जाहीर
शुल्क माफीसह दहा सवलती मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत जाहीर केल्या. केंद्र शासनाकडून मदत मिळाली नाही तरी टंचाईग्रस्तांसाठी एकही पैसा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
First published on: 21-12-2012 at 05:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten conceeit declared for draught affected in state