वेदान्त फॉक्सकॉन आणि टाटा-एअरबस सारखे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, आता नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले अरविंद सावंत?
“गुजरातमध्ये भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येत आहेत. राज्यात वेदान्तचा प्रकल्प येईल, अस छातीठोकपणे मुख्यमंत्री बोलले होते. मात्र, तसं झालं नाही. एअरबसच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आणि आता जखमीवर मीठ चोळणारी घटना म्हणजे सॅफ्रन कंपनीही हैदबादला जात आहे, त्यामुळे आता राज्य सरकारने महाराष्ट्राला ‘जय महाराष्ट्र’ करत सत्तेतून बाहेर पडावे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
हेही वाचा – ‘वेदांता फायरफॉक्स’, ‘टाटा-एअरबस’नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?
“राज्यातील डबल इंजिनच्या सरकारचे एक इंजिन फेल असून ते सध्या उलटा प्रवास करते आहे. एखादी कंपनी राज्याबाहेर जात असेल तर आपण समजू शकतो. मात्र, हे सातत्याने होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस हे सरकार चालवण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा”, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.
“राज्य सरकारडून रोजगार निर्मिती, महागाई किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अशा महत्त्वाच्या प्रश्वांकडे हे सरकार दुर्लक्ष होते आहे, या गोष्टीचं वाईट वाटतं. ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला आणि लागली किरकिरायला’ अशी सद्याची परिस्थिती आहे”, असेही ते म्हणाले.