“ विश्वासघाताने गेलेलं सरकार मेहनतीने आणता येतं ” ; चंद्रकांत पाटील यांचं पत्रकारपरिषदेत विधान!

“ज्या राज्यकर्त्याला भविष्य कळतं त्याला हे लक्षात येईल की या देशात आगामी काळ मोदींचाच आहे.”, असं देखील म्हणाले आहेत.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे पत्रकारपरिषदेत बोलताना महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी विश्वासघाताने गेलेलं सरकार मेहनतीने आणता देखील येतं, असं देखील बोलून दाखवलं.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “जरी महाराष्ट्रात सरकार नसलं आणि विरोधकांचं सरकार असलं तरी देखील लोकांना याची जाणीव आहे की, दोन वर्षात सरकार असूनही काही आपल्या पदारात पडलं नाही. त्या तुलनेत मागील पाच वर्षात जे मागेल ते मिळेल अशी स्थिती होती. मी आमच्या मतदारांना आणि जे आमच्याशी जुडणार आहेत त्यांनाही आवाहन करतो. ज्या राज्यकर्त्याला भविष्य कळतं त्याला हे लक्षात येईल की शेवटी या देशात आगामी काळ जो आहे तो मोदींचा आहे. विश्वासघाताने सरकार गेलं हा भाग वेगळा. विश्वासघाताने गेलेलं सरकार मेहनतीने आणता देखील येतं. मग ते आजपर्यंत का नाही आलं, तर आपल्या कारणं माहिती आहेत की कोविडमध्ये इतके आम्ही असंवेदनशील नाही की कोविडाचा भडका उडालेला असताना आम्ही सरकारं बनवत बसू. आता कोविडचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला असून, जनजीवन सुरळीत होत आहे. त्यामुळे राजकारणाला देखील वेग येईल. या निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित होईल, असं मला वाटतं.”

तसेच, या अगोदर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, “भाजपा नेते आणि माजी खासदार धनंजय महाडीक यांनी अतिशय सविस्तरपणे या निवडणुकीतील भाजपाची भूमिका मांडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून काही ठिकाणी तीन जिल्हे, काही ठिकाणी दोन जिल्हे आणि अधिक संख्या असणाऱ्या ठिकाणी एक जिल्हा असे आमदार विधानपरिषदेवर निवडून जातात. सहा ठिकाणची निवडणूक १० डिसेंबरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या आहे. भाजपाने अगोदर महाराष्ट्र प्रदेशाची कोअर कमिटी आणि मग देशाचे संसदीय मंडळ या दोन्ही ठिकाणी ही पाच नावं नक्की केली. कारण, मुंबईत आपण दोन पैकी एकच जागा लढवणार आहोत. त्यामध्ये कोल्हापूर जागेसाठी माजी आमदार व भाजपाचे नेते अमोल महाडीक यांचं नाव निश्चित केलं आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. त्यावेळी स्वाभिवकपणे जे जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले आहेत, असे प्रमुख नेते आम्ही सर्वजण अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहोत. मी दोन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलं. की सहा वर्षांपूर्वीची स्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे. एक नकारात्मक फरक हा आहे की, सरकार नाही. सरकार त्यांचं आहे परंतु सकारात्मक गोष्टी खूप आहेत. जसं मागील निवडणुकीत प्रकाश अण्णा यांचा ताराराणी पक्ष इचलकरंजी आणि विनय कोरे यांचा जनसुराज्य हे भाजपा सोबत नव्हते. किंबहुना त्यावेळी महादेव जानकर यांनी अपक्ष फॉर्म भरला होता आणि भाजपाने पाठिंबा दिला होता. त्या अर्थाने भाजपा पुरस्कृत महादेव जानकर यांच्याबरोबर हे दोन बलाढ्य नेते नव्हते. ते या निवडणुकीच्या निमित्त आले असं नाही. तर विनय कोरे हे जिल्हापरिषद निवडणुकीपासून सोबत आहेत आणि राज्याच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणात ते खांद्याला खांदा मिळवून आहेत. तर आता हे दोन्ही बलाढ्य नेते यावेळी सोबत आहेत. ”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The government that was lost by treachery can be brought back by hard work chandrakant patil msr