नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्याने शिवसेनेचं अधिवेशन पार पडतं आहे. या अधिवेशनाच्या आधी म्हणजेच २२ जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळा राम मंदिरात सहकुटुंब गेले होते. तिथे त्यांनी रामाची आरती केली. त्यानंतर गोदावरी तीरावरही आरती केली. आज त्यांचं भाषण होणार आहे. या अधिवेशनाला पोहचलेल्या संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीकेची तोफ डागली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

१९९४ ला दार उघड बये दार उघड ही आमची घोषणा होती. आत्ताही आमची ती घोषणा कायम आहे. त्यापुढे जाऊन सांगतो दार उघडलं गेलं नाही तर लाथ मारुन आत जाऊ असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

त्यांच्या लंकेचं दहन होईल

“एकनाथ शिंदे आत्ता ज्यांच्याबरोबर बसले आहेत त्यांच्या लंकेचं दहन होईल आणि हे असे बेईमान लोकही त्यात जळून जातील. आत्ताचं भाषण हे तर खुल्या अधिवेशनातलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे अधिक मोकळेपणाने बोलतील.” असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका केली आहे.तसंच आज दुपारी झालेल्या भाषणातही त्यांनी भाजपावर आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली.

हे पण वाचा- “उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही…”, सुरेश भटांच्या ओळी वाचत उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका

“रामायण अयोध्येत कमी, महाराष्ट्रात जास्त”

“रामायण अयोध्येत कमी आणि पंचवटीत, महाराष्ट्रात जास्त घडलंय. प्रभू श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण आहे. मला तर वाटतंय की आता प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातात आता मशाल येईल. ते म्हणतात की भाजपामध्ये विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. आम्ही आमच्या रामाला पुजतो, तुम्ही तुमच्या विष्णूची पूजा करा. पण रामाचं धैर्य विष्णूमध्ये नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“प्रभू श्रीरामाप्रमाणेच उद्धव ठाकरे संयमी”

श्रीरामांप्रमाणेच उद्धव ठाकरे संकटकाळात संयमी असल्याचं राऊत म्हणाले. “प्रभू श्रीरामावर अन्याय झाला. तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असतील? पण राम शांत राहिला. संधीची वाट पाहात राहिला, जसे उद्धव ठाकरे संयमानं संधीची वाट पाहात आहेत. रामासमोर एका बाजूला राज्याभिषेकाची तयारी चालू असताना दुसरीकडे वनवासाकडे जाण्याचे निर्देश आले. रामाचा तो संयम मी उद्धव ठाकरेंमध्ये पाहातो. त्यामुळे रामाप्रमाणेच उद्धव ठाकरेजी, वेट अँड वॉच. आपलीही वेळ येईल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.