मराठी नाट्यसृष्टीत विजय केंकरे आणि विनय आपटे या दिग्दर्शकांची परंपरा पुढे केदार शिंदे, देवेंद्र पेम आणि संतोष पवार या तीन दिग्दर्शकांनी समर्थपणे चालवली. लोकसत्ताच्या लिटफेस्टमध्ये या तिघांनीही त्यांच्या नाटकांबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान दिग्दर्शक संतोष पवार यांनी यदा- कदाचित या त्यांच्या गाजलेल्या नाटकाला आनंद दिघेंनी कशी मदत केली त्याचा किस्सा सांगितला. लोकसत्ता लिटफेस्टसाठी अजित भुरे यांनी या तिघांचीही मुलाखत घेतली. या मुलाखतीत हा किस्सा संतोष पवार यांनी सांगितला.

काय म्हणाले दिग्दर्शक संतोष पवार?

“यदा-कदाचित ही एकांकिका होती. नमन नाट्याच्या फॉर्ममध्ये हे नाटक आणायचं हे मी डोक्यात अगदी ठरवून टाकलं होतं. महाविद्यालयात जेव्हा एकांकिका झाली तेव्हा ती लोकांना खूप आवडली. मी मूळचा कोकणतला आहे. नमन, नाट्य, दशावतार हे मी कायम पाहिलं होतं. त्यामुळे तो प्रभाव माझ्यावर होता. सत्याचा विजय शेवटीच होतो असा संदेश देणारी ही एकांकिका मी लिहिली. मी जिथे एकांकिका सादर केली तिथे मराठी मुलं जास्त नव्हती. मी भगवद्गीताही वाचली, त्यानंतर एकांकिका आयएनटीला तुफान चालली. पण त्याला परीक्षकांचा प्रतिसाद काहीही मिळाला नाही. सर्वोत्कृष्ट एकांकिका यदा कदाचित, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक संतोष पवार असं प्रेक्षक ओरडत होते. पण आम्हाला बक्षीस सोडा प्रमाणपत्रही मिळालं नाही.” अशी आठवण संतोष पवार यांनी सांगितली.

प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यासाठी महत्त्वाचा होता-संतोष पवार

केदार शिंदेचा असिस्टंट म्हणून काम केलं होतं. आम्हाला बक्षीस किंवा प्रमाणपत्र मिळालं नाही पण प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही भारावून गेलो होतो. त्यानंतर मी या एकांकिकेचं नाटक केलं. काही प्रयोगही करुन पाहिले. पण दत्ता घोसाळकर मला शोधत आला. त्याने मला विचारलं की नाटक करुया का? मी म्हटलं हो करु. मग मी ते नाटक करायला घेतलं. किशोर चौगुले, कमलाकर सातपुते, रमेश वाणी, समीर चौगुले या सगळ्यांना मी गोळा केलं. असं संतोष पवार यांनी सांगितलं.

संजय नार्वेकरही नाटकात होता पण त्याला वास्तव मिळाला-संतोष पवार

सुरुवातीला संजय नार्वेकरही काम करत होता. पण चार ते पाच दिवस झाल्यावर मला त्याने सांगितलं की त्याला हिंदी सिनेमा मिळतो आहे. जर तू म्हणत असशील तर मी तो सोडतो. पण नाटकाचं काय होईल मला माहीत नव्हतं, म्हणून मी संजयला सांगितलं की तुला सिनेमा मिळतो आहे तर तो तू कर. तो चित्रपट होता वास्तव. जो खरंच संजयच्या आयुष्यातलं वळण ठरला. दत्ता घोसाळकरला मी सांगितलं संजय नार्वेकर काम करु शकत नाही. त्यावर दत्ता म्हणाला की तुला ज्याला पाहिजे त्या कलाकाराला घे पण नाटक कर. यदा कदाचितचा दहावा प्रयोग होता आणि काही लोक कुरुबुरी सुरु केल्या, प्रयोग उधळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रत्येक प्रयोगाला अशा घटना घडू लागल्या. स्टेजवर घोषणाबाजी दिल्या, सेट पाडला, पूजा उधळली. हिंदू देवतांची विटंबना करत आहात असा आरोप त्या आंदोलकांनी केला. मुळात माझ्या नाटकात देव नव्हतेच. कौरव आणि पांडव हे देव नाहीत. शिवाय त्यात कृष्णाची जी भूमिका आहे तो कलाकार लोकनाट्याच्या फॉर्ममध्येच येतो. नमन नाट्याप्रमाणेच कृष्ण येत होता. तरीही काय चूक आहे कळत नव्हतं. असं संतोष पवार म्हणाले.

आनंद दिघेंनी सांगितलं नाटक बंद होणार नाही-संतोष पवार

सत्याचा विजय शेवटी का होतो असा विषय होता. आम्ही अनेक संघटनांना भेटलो. मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे बळाची ताकद असेल तर माझ्याकडे बुद्धीची ताकद आहे तुम्ही म्हणाल ते बदल करुन मी नाटक करु शकतो. मी देवाची विटंबना केली नाही. एक दिवस मला दत्ता म्हणाला की आपण आनंद दिघेंकडे जाऊ. त्यानंतर आम्ही आनंद दिघेंना भेटलो. आनंद दिघेंना मी सांगितलं की तुम्ही माझं नाटक (यदा कदाचित) बघा. तुम्ही म्हणालात की नाटक करु नकोस तर मी तुम्हाला काहीही म्हणणार नाही, मी नाटक बंद करेन. कारण आम्हाला कुणी पाठिंबा देणारा माणूसच मिळत नव्हता. दत्ताने रात्री बारा वाजता नाटकाचा प्रयोग आयोजित केला. आनंद दिघे, त्यांची माणसं, विरोध करणाऱ्या संघटनांचे लोक, असे सगळेच नाटकाला आले होते. नाटक सुरु झाल्यानंतर सगळे खो खो हसू लागले. आनंद दिघेंनी निर्णय दिला की हे नाटक विडंबन आहे हे बंद होणार नाही. आम्हाला वाटलं आम्ही जिंकलो. पण नंतर व्हायचं काय की यदा कदाचितला विरोध केला की प्रसिद्धी मिळते. मग आम्ही जिथे जाऊ तिथे आम्हाला विरोध झाला. पोलीसही सांगायचे की आम्हाला आता काय करता येईल? पण आम्ही तरीही प्रयोग केले. कधी कधी पेटते बोळेही प्रयोग करत होते. या नाटकाचे आम्ही ४ हजार ५०० प्रयोग केले. असं संतोष पवार यांनी सांगितलं.