अलिबाग – राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत २०१७ मध्येच युती करण्याचा निर्णय घेतला होता. जागा वाटप, मंत्रीपद वाटप याबाबतही ठरले होते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या समवेत आमची बैठक झाली. मात्र तुम्ही आमच्यासोबत या पण आम्ही शिवसेनेला सोडणार नाही अशी अट त्यांनी ठेवली. त्यामुळे निर्णय होता होता राहिला असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. ते अलिबाग येथे प्रचारसभेत बोलत होते.

यावरून भाजपची शिवसेनेच्या युतीबाबत असलेली कटीबद्धता दिसून येत. २०१९ ला शिवसेना भाजप एकत्र लढले. नंतर मात्र शिवसेनेनी आमच्यासोबत सत्ता स्थापन केली. हा निर्णय न पटल्याने शिवसेनेच्या आमदारांनी वेगळा गट स्थापन करून महायुतीत प्रवेश केला. आम्हीदेखील व्यापक राष्ट्रहित आणि विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत सहभागी झालो. राजकारणात अपरिहार्यता असतात. त्यामुळे वेळोवेळी व्यापक हितासाठी असे निर्णय घ्यावे लागत असल्याचेही तटकरे म्हणाले.

हेही वाचा – कोव्हिशिल्ड लशीमुळे धोका किती? कोविड कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकरांनी दिलं उत्तर…

अनंत गीते आठ वेळा लोकसभा निवडणूक लढले, प्रत्येकवेळी भाजप त्यांच्यासोबत होती. भाजपमुळेच दोन वेळा त्यांना मंत्रीपदही मिळाले, आज तेच अनंत गीते भाजपवर टीका करत आहेत. त्यांनी टीका करताना भान राखले पाहिजे. अनंत गीते हे अवजड उद्योग विभागाचे मंत्री होते. पण त्यांनी एकही प्रकल्प आपल्या मतदारसंघात आणला नाही. या उलट विलासराव देशमुख आणि प्रफुल्ल पटेल यांनी हे मंत्रीपद जेव्हा संभाळले होते, त्यांनी आपापल्या मतदारसंघात मोठे प्रकल्प आणले, ज्यामुळे आज स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला याची आठवण तटकरे यांनी करून दिली.

हेही वाचा – Maharashtra District Index : कुपोषणाचा प्रश्न गंभीरच

सुमारे चाळीस मिनटे केलेल्या आपल्या भाषणात तटकरे यांनी शेकापवरही सडकून टीका केली. जयंत पाटील यांनी शेकापची धुरा संभाळल्यापासून पक्षाला उतरती कळा लागली. लोकसभा निवडणुकीत शेकापचा उमेदवार दिसणे बंद झाला. शेकापचे दुकान बंद होत आले आहे. दुकानाचे अर्ध शटर खाली आले आहे. ७ मे नंतर उरलेले शटर खाली करून त्याला कुलूप लावायची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. मतदारसंघाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला पुन्हा निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आमदार महेंद्र दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, शिवसेनेचे जेष्ट नेते विजय कवळे, भाजपचे महेश मोहिते, गिरीष तुळपुळे, पल्लवी तुळपुळे, अंकीत बंगेरा आदी नेते उपस्थित होते.