बळीराजा हा संकटात सुद्धा राबत असतो. आपण लॉकडाउनमध्ये घरी बसलेलो होतो तेव्हा शेतकरी राबत होता. शेतावर काम करत कर्तव्य बजावत होता. आज त्यानं आपल्याला साद घेतलेली आहे. आज त्याला आपली गरज आहे. तेव्हा आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं रहायला हवं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला पाहिजे. हा राजकीय बंद नाही, त्यामुळे जनतेनं स्वेच्छेनं आणि स्वयंस्फुर्तीनं या बंदमध्ये सहभागी व्हायला हवं, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

राऊत म्हणाले, “जनतेनं स्वयंस्फुर्तीनं बंदमध्ये सामिल झाल्यास खऱ्या अर्थानं त्या बळीराजाला पाठिंबा ठरेल. जरी यामध्ये अनेक राजकीय पक्ष उतरले असले तरी हा राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा संघटनेच्या मागण्या मान्य करण्यासाठी पुकारलेला हा बंद नाही तर देशातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद व्हावा यासाठी हा बंद आहे.”

आणखी वाचा- कृषी क्षेत्रासंबंधी शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रावर संजय राऊतांचं भाष्य, म्हणाले…

“गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडी वाऱ्याची आणि सरकारने सुरु केलेल्या दडपशाहीची पर्वा न करता शेतकरी दटून बसला आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकानं त्याला समर्थन देणं गरजेचं आहे, म्हणून शिवसेनेनं आवाहन केलं आहे की, नागरिकांनी स्वेच्छेनं आणि स्वयंस्फुर्तीनं या बंदमध्ये सहभागी व्हावं. बळीराजाप्रती आपली कृतज्ञ भावना व्यक्त करावी,” असंही राऊत यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “ही तर देशी ईस्ट इंडिया कंपनीची मुहूर्तमेढ आहे”

…तेव्हा शिवसेना पक्ष प्रमुख आपली भूमिका स्पष्ट करतील

राऊत म्हणाले, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची अकाली दलाच्या नेत्यांनी भेट घेतली, देशभरातही हे नेते गेले होते. शेतकऱ्यांच्या पाठिंब्याबाबतच्या बैठकीचा निर्णय केवळ अकाली दल घेऊ शकत नाही. आता हा विषय देशव्यापी झालेला आहे. आम्ही सुद्धा देशातील इतर सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतो आहोत. ही चर्चा झाल्यानंतर चर्चेतील सारावर आम्ही शिवसेना पक्ष प्रमुखांशी यावर चर्चा करु त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करतील.