जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) सध्याची कार्यप्रणाली बदलून त्यात सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय सदस्य समिती स्थापन केली आहे. सध्याच्या व्यवस्थेनुसार जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी असतात. त्यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली जाते. २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. आशीष जयस्वाल यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या (सववसाधारण) कार्यप्रणालीत सुधारणा करून त्यात सुसूत्रता आणण्याचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
हेही वाचा >>> चंद्रपूर: नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करा; सुधीर मुनगंटीवार
अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावरील चर्चेला उत्तर देताना योजनेत सुधारणा करण्याबाबत सूचित केले होते. शाश्वत विकास ध्येय व व्हिजन डाक्युमेंट-२०३० याच्याशी सांगड घालून योजनेत सुधारणा करण्याची तसेच योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी उपाययोजनेवर भर दिला होता. त्यानुसार नियोजन विभागाने जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची घोषणा केली. त्यात नियोजन विभागाचे अप्पर मुख्यसचिव आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातील सचिव श्रीकर परदेशी यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती योजनेच्या सुधारित कार्यप्रणालीबाबत उपाययोजना सुचवणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी २५ मे रोजी काढण्यात आला. जयस्वाल हे शिंदे गटाचे आमदार असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.