करोना प्रादुर्भाव वरचेवर वाढत चाललेल्या सोलापुरात सोमवारी करोनाबाधित अकरा नवे रुग्ण आढळून आले. तसेच तिघा जणांचा बळी गेला. आतापर्यंत करोना रुग्णसंख्या २७५ वर पोहोचली तर मृतांचा आकडा १७ झाला आहे.

सोमवारी शहरातील एकतानगर, शास्त्रीनगर, पाच्छा पेठ, बुधवार पेठ आदी भागात सहा पुरुष व पाच महिला असे मिळून अकरा करोनाबाधित रुग्ण सापडले. यातील एका महिलेसह तिघा जणांचा मृत्यू झाला. न्यू पाच्छा पेठेतील जवाहरनगरात राहणाऱ्या एका ५० वर्षांच्या पुरुषाला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. तर पाच्छा पेठेतील एका ४६ वर्षांच्या महिलेचाही रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला.

याशिवाय याच भागातील अन्य एका ६८ वर्षीय वृद्धाचाही मृत्यू झाला. या तिघाही मृतांना करोनाची बाधा झाली होती, असे दिसून आले.