मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातून जाणारा उड्डाण पूल वाहतुकीस अधिकृतरीत्या खुला झाला नसतानाच त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी या उड्डाण पुलावर कामगाराचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी स्विफ्ट कार व स्प्लेंडर यांची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यातील एका लहान मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. महिनाभरापूर्वी गरवारे चौफुलीसमोर उड्डाणपुलावर अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाला होता. महामार्गावर शहरात सुमारे साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल आहे. सव्‍‌र्हिस रोडवरून वाहनधारक महामार्गावर जाऊ नये म्हणून लोखंडी बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी ते तुटलेले असल्याने दुचाकी वाहनधारक ंमहामार्ग ओलांडण्यासाठी त्याचा वापर करतात. अशाच प्रकारात हा अपघात झाला. राणेनगर व स्टेट बँकेकडून दुचाकी वाहनधारक दुपारी बारा वाजता महामार्ग ओलांडत असताना भरधाव आलेल्या कारने तिला धडक दिली. त्यात कारमधील आदिती पवार ही साडेसहावर्षीय मुलगी जखमी झाली. दुचाकी चालक माधव कोल्हे व कारचालक शरद नेरकर हे जखमी झाले. आदिती ही सटाण्याचे डॉ. सचिन माणिक पवार यांची मुलगी आहे. आदिती व कोल्हे यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अपघाताची माहिती समजल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यानच्या काळात पोलीस व राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व हे काम करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सिडकोतील चौपाटीलगतच्या भागात उड्डाणपूल सव्‍‌र्हिस रोडला समांतर आहे. काही ठिकाणी बॅरिकेट्स तुटल्याने दुचाकी वाहनधारक महामार्ग ओलांडण्यासाठी त्याचा वापर करतात. त्याची परिणती या अपघातात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. महामार्गावर दुचाकी वाहनधारकांना या पद्धतीने शिरकाव करता येणार नाही, याकरिता योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक होते. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, तातडीने तत्सम उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. या अपघाताप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.