महाराष्टातील साडेतीन शक्तिपीठापैकी करवीर निवासिनी महालक्ष्मी अथवा अंबाबाई म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान.
महालक्ष्मी मंदिर व मंदिरातील महालक्ष्मीच्या मूर्तीविषयीचा व करवीरनगरी असा उल्लेख अनेक पूराणांमध्ये आढळतो. कोल्हापूर शहराच्या मध्यावर असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बांधकामामध्ये काळ्या कातळाचा वापर करण्यात आला आहे. या काळ्या कातळामुळे देवीच्या मंदिराची भव्यता अधिक खुलते. इ.स. ५५० ते इ.स. ६६० या चालुक्यांच्या शासन काळामध्ये या मंदिराचे बांधकाम केल्याचे दाखले आहेत. एकूणच स्थापत्य कलेच्या अविष्कारावरून व इतिहासातील दाखल्यांवरून चालुक्य राजा मंगलेशच्या कारकीर्दीमध्ये या मंदिरामध्ये महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचे आढळते.
महालक्ष्मी मंदिरात एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मूळ मंदिराला जोडून गरूड मंडप उभा आहे.
बाराच्या शतकात शिलाहार राजाने महासरस्वती मंदिर, महालक्ष्मीचा प्रदक्षिणामार्ग बांधल्याचेही दाखले सांगतात. चालुक्यांबरोबरच, राष्ट्रकुट, शिलाहार आणि यादव या राजघराण्यांनी देखील महालक्ष्मीला आराध्य दैवत मानल्याचे दाखले आढळतात.
चालुक्याच्या काळात मंदिरासमोरील गणपतीची स्थापना झाली. १३व्या शतकात नगारखाना व कचेरीचे बांधकाम तसेच मंदिराच्या आवारात दिपमाळा बांधण्यात आल्या. मंदिराच्या आवारात सध्या सात दिपमाळा अस्तित्वात आहेत.
१७व्या शतकानंतर विविध राजघराण्यातील थोर मंडळींनी या मंदिराला भेटी दिल्या. त्यानंतर दिवसेंदिवस महालक्ष्मीचे भक्त वाढतच गेले आणि अंबाबाई अवघ्या महाराष्ट्राची आद्यदेवता बनली.
महालक्ष्मीकडे तिच्या भक्तांचा ओघ सतत सुरू असतो. महालक्ष्मी मंदिरामध्ये दररोज विविध विधी केले जातात. त्यामध्ये भल्या पहाटे काकड आरतीने विधींना सुरूवात होते. सकाळी महापूजेनंतर महालक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. दुपारची अलंकारपूजा झाल्यानंतर संध्याकाळी देवीची धूपार्ती करण्यात येते. सर्वात शेवटी रात्री देवीच्या विश्रांतीसाठी शेजार्ती होते. महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षी तीन महत्त्वाचे उत्सव होतात. त्यामध्ये पहिला एप्रिल महिन्यातील रथोत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे. देवीची रथामधून मिरवणूक काढण्यात येते. नवरात्रोत्सवामध्ये दहा दिवस लाखो भक्तगण महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. किरणोत्सव हा देखील महत्वाचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सूर्यांची किरणे बरोबर देवी अंबाबाईच्या मूर्तीवर पडतात. हा सोहळा पाहणे भक्तांसाठी पर्वणीच असते. वर्षातील तीन वेळा किरणोत्सवाचा सोहळा पार पडतो.
महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जाण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व इतर महत्त्वाच्या शहरांमधून राज्य परिवहन मंडळाच्या थेट बस आहेत. राज्याची राजधानी मुंबई ते कोल्हापूर हे अंतर बसने ३७६ किमी असून, रेल्वेचा प्रवास ४६५ किमीचा आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून दररोज महालक्ष्मी एक्स्प्रेस सुटते. महालक्ष्मी एक्स्प्रेस पुणे-सांगली मार्गे कोल्हापूरला जाते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2013 रोजी प्रकाशित
महाराष्ट्रारातील शक्तीपीठे : करवीर निवासिनी महालक्ष्मी
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी करवीर निवासिनी महालक्ष्मी अथवा अंबाबाई म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान.

First published on: 12-10-2013 at 10:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three shaktipiths of maharashtra mahalaxmi of kolhapur