महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर एका तरुणाने शाई फेकण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील राजापूर येथे शनिवारी दुपारी हा संतापजनक प्रकार झाला. तेथील जमावाने त्या तरुणाला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान शहरासह तालुक्यातही या प्रकरणाच्या दिवसभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून सर्वत्र निषेध व्यक्त केला गेला. या घटनेच्या निषेधार्थ उद्या (रविवार) काँग्रेसने शहर बंदचे आवाहन केले आहे. याच तरुणाने पूर्वी तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मारहाण केली होती.
भाऊसाहेब हासे असे या तरुणाचे नाव असून तो राजापूरचाच रहिवासी व युवासेनेचा पदाधिकारी आहे. त्याने हे कृत्य कशासाठी केले याचे कारण समजू शकले नाही. जमावाच्या मारहाणीत जखमी झाल्यामुळे त्याच्यावर संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जवळे कडलग येथील नियोजित कार्यक्रम आटोपून थोरात संगमनेरकडे परतत होते. वाटेत राजापूर गावातील युवा कार्यकर्त्यांनी एका फलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते ठेवले होते. त्यासाठी थोरात आपल्या वाहनातून खाली उतरल्यानंतर हासे याने काही कळायच्या आत त्यांच्या दिशेने शाई फेकली. त्यावरही संयम दाखवत थोरात आपल्या वाहनात बसून संगमनेरकडे मार्गस्थ झाले. नंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी हासे याला चोप दिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थोरात यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांनी जमावाच्या तावडीतून हासे याची सुटका करत त्याला पोलिस ठाण्यात नेले.
घटनेची माहिती वा-यासारखी तालुकाभर पसरली. गेली तीस वर्षे सत्तास्थानी असतानाही कोणत्याही विरोधकाच्या बाबतीत कधी सुडाची भावना मनात न बाळगणा-या आपल्या नेत्याचा असा अवमान झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतापले होते. अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचा-यांतही या प्रकाराने संतापाची लाट निर्माण झाली. त्यानंतर संतप्त काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते पोलिस ठाण्यात गोळा झाले. याच व्यक्तीने लोकसभा निवडणुकीच्या काळात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मारहाण केली होती. त्याच वेळी कडक कारवाई झाली असती तर असा प्रकार पुन्हा करण्याचे त्याचे धाडस झाले नसते, असा आरोप कार्यकर्ते करत होते. आता तरी त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर याच जमावाने दिल्ली नाका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. घुलेवाडी येथेही रास्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला.