चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या तालुक्याच्या ठिकाणापासून पाच किमीवर असलेल्या बाम्हाणी गावात पट्टेदार वाघ शिरल्याने खळबळ माजली. या वाघाने गावातील एका शेतकऱ्यावर हल्ला करुन त्याला जखमीही केले. त्यानंतर या वाघाने जवळच असलेल्या एका गोठ्यामध्ये शिरुन ठाण मांडले. त्यामुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे.

नागरिकांना ही वार्ता कळताच दबा धरुन बसलेल्या वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. बाम्हाणी गावातील मनोहर पाल हा शेतकरी आपल्या घराजवळच्या शेतात वखरणीचे काम करीत होता. त्याला तहान लागल्याने तो घराकडे येऊन पाणी पिऊन पुन्हा आपल्या वखरणीसाठी निघाला. यावेळी थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याला पट्टेदार वाघ दिसला. यावेळी हा वाघ आपल्या बैलाला ठार करेन म्हणून तो कसाबसा बैल सोडण्यासाठी जात असताना वाघाने त्याच्यावर हल्ला चढवला. वाघाने मारलेल्या पंजाने हा शेतकरी जखमी झाला. त्यानंतर वाघ या शेतकऱ्याच्याच गोठ्यात शिरला.

गावातील लोकांना याची माहिती कळताच वाघाला पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला. या घटनेची माहिती नागभीड वनविभागाला व पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर लगेच दोन्ही विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाघ ठाण मांडून बसलेल्या गोठ्यावर जाळी लाऊन त्याला जाळ्यात अडकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात संध्याकाळ झाली, तरीही हा पट्टेदार वाघ त्यांच्या जाळ्यात आला नव्हता.

सुत्रांच्या माहितीनुसार, वाघ जखमी झाला असल्याने तो गोठ्यातच ठाण मांडून बसला आहे. अन्यथा एव्हाना तो तिथून निघून गेला असता. वाघाला पाहण्यासाठी परीसरातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. ब्राम्हाणी हे गाव नागभीड-नागपूर रोडवर असल्याने या रस्त्यावरही काही वेळासाठी वाहतुक कोंडी झाली होती.