महाराष्ट्र व गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी आंतर राज्य पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या प्रश्नावरून गेले पंधरा दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनाअंतीही सुरूच राहिले आहे. दरम्यान गोवा मुख्यमंत्री ना. मनोहर पर्रिकर यांनी महाराष्ट्र सरकारला धडा शिकविण्याचे भाष्य केल्यावरून पाणी प्रश्नावर ठिणगी पडली आहे.
तिलारी आंतरराज्य जलविद्युत पाटबंधारे प्रकल्पाला सुमारे ३५ वर्षे झाली आहेत. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सुमारे ८०० प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य अंधकारमय झाल्याने नोकरीसाठी गेली चार वर्षे लढा देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी गेले पंधरा दिवस गोवा राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यातच कुटुंबीयासह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
गोवा राज्याला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या कालव्यातच प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन करून गोवा सरकारचे नाक दाबण्याचा प्रयत्न केल्याने मुख्यमंत्री ना. मनोहर पर्रिकर संतापले आहेत. त्यांनी प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचे बंधन नसल्याचे सांगत हा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी पाणीपुरवठा बंद करणे गैर असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे, आमदार दीपक केसरकर यांनी गोवा सरकारने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत समावून घ्यावे किंवा भरपाई म्हणून वनटाईम सेंटलमेंट करावे असे म्हटले होते. पण त्याला गोवा सरकारने दाद दिली नव्हती. सर्वपक्षीयांनी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.
मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्यापूर्वी गोवा मुख्यमंत्री ना. पर्रिकर यांनी पाणी प्रश्नावरून धडा शिकवू असे भाष्य केले. त्यानंतर कुडाळात राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत, अमित सामंत यांनी रास्ता रोको व प्रतिमादहन कार्यक्रमाने उत्तर दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना गोवा सरकारचा राष्ट्रवादीने धिक्कार केला.
सिंधुदुर्ग नगरीत तिलारी प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, पण मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील प्रश्न एका महिन्यात तर अन्य प्रश्न दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सोडविण्याचे आश्वासन दिले, पण त्यावर प्रकल्पग्रस्तांनी नकार देत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
गोवा राज्याला कालव्याचे पाणीच जात नसल्याने पाणी प्रश्न भेडसावू लागल्याने कालवा विभागातील गोवा भाजपच्या आमदारांनी महाराष्ट्र सरकारचा धिक्कार सुरू केला आहे. त्यातच गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी ना. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
गोवा राज्याला पाणीपुरवठा करणारा कालवा बंद ठेवण्यात आंदोलक पंधरा दिवस यशस्वी ठरल्याने गोवा मुख्यमंत्री संतापले आहेत. पंतप्रधानांसमवेत त्यांची लवकरच बैठक आहे, तेथे हा मुद्दा उपस्थित करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे पाणीप्रश्न तापला आहे. शिवाय भाजप व काँग्रेस असा राजकीय आखाडा बनला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
तिलारी प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन धुडकावले
महाराष्ट्र व गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी आंतर राज्य पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या प्रश्नावरून गेले पंधरा दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आश्वासनाअंतीही सुरूच राहिले आहे.
First published on: 26-12-2012 at 04:39 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tilari project effected peoples throws the assurance by cm