जिल्हा सिटूच्या त्रवार्षिक अधिवेशनानिमित्त शनिवारी सातपूर येथील अशोकनगर पोलीस चौकीजवळ सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉ. श्रीधर देशपांडे हे सभेच्या अध्यक्षस्थानी राहणार असून किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष जे. पी. गावित, सिटूचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, सिटूचे प्रदेश उपाध्यक्ष सईद अहमद हे सभेला मार्गदर्शन करणार आहेत. देशात एकीकडे भेडसावणारी महागाई, तर दुसरीकडे अन्नधान्य, रॉकेल व गॅसची टंचाई अशी स्थिती आहे. संघटित व असंघटित कामगारांना जगता येईल इतके किमान वेतन नाही. टपरीधारक, छोटे व्यापारी यांचेही हाल आहेत. प्रचंड कंत्राटीकरणामुळे अत्यल्प उत्पन्नाखेरीज नोकरीची शाश्वती नाही. वृद्ध व कष्टकऱ्यांना पेन्शन नाही, सामाजिक सुरक्षा नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे सरकार श्रीमंत व गर्भश्रीमंतांना कोटय़वधी रुपयांच्या सवलती देण्यात दंग आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या परदेशी विमा कंपन्या, बँका यांचे हित जोपासत आहे. शिक्षण, औषधोपचार घेणेही अशक्य होत आहे. या सर्व गंभीर परिस्थितीवर जनतेशी संवाद साधता यावा म्हणून नाशिक जिल्हा सिटूच्या त्रवार्षिक अधिवेशनानिमित्त आयोजित जाहीर सभेस सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.