प्रदीप नणंदकर

वृक्षाचे संगोपन आणि त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील पहिली ‘ट्री अ‍ॅम्ब्युलन्स’ सेवा लातुरात संगम हायटेक नर्सरीचे संगमेश्वर बोमणे यांनी उपलब्ध करून दिली आहे.

बागेसाठी, शेतासाठी लोक विविध वृक्ष, फुलझाडे, शोभेची झाडे, फळझाडे घेऊन जातात. मात्र त्याची योग्य वाढ होत नसेल, तर केवळ दूरध्वनीवरून त्यांना माहिती सांगून फारसा उपयोग होत नाही. किंवा छोटय़ा प्रमाणावर औषधे विकत घेणे, योग्य ती काळजी घेणे सर्वानाच जमते असे नाही. याशिवाय सार्वजनिक ठिकाणच्या वृक्षाची काळजी घेणे याकडेही दुर्लक्ष होते. यावर उपाय म्हणून एका तासाच्या आत जिल्हाभरात दूरध्वनीनंतर ही सेवा दिली जाणार आहे.

एका वाहनामध्ये वृक्षासाठी लागणारी खते, औषधे व तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत. दूरध्वनी आल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन वृक्षाची योग्य ती काळजी ते स्वत: घेतील, छाटणी असेल, वृक्षाची योग्य वाढ होत नसेल, तर त्यावर योग्य ते उपचार केले जातील. घरगुती लोकांसाठी माफक दर लावला जाणार असून सार्वजनिक ठिकाणी एखादे वृक्ष उन्मळून पडले असेल किंवा फाटे तुटले असतील तर त्याची काळजी विनामोबदला घेतली जाणार आहे.

राज्यातील हा पहिला अभिनव प्रयोग लातुरात होतो आहे. गेल्या १४ वर्षांपासून लातुरात संगम नर्सरीचे काम सुरू असून त्यांच्याकडे ८२ कर्मचारी काम करतात.

फळे, फुले, शोभिवंत झाडे यांच्या सुमारे ८५० प्रजाती त्यांच्याकडे आहेत. मराठवाडय़ातील सुमारे १६०० छोटय़ा, मोठय़ा बागा त्यांनी विकसित केल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने ट्री अ‍ॅम्ब्युलन्स ही नवीन कल्पना अमलात आली असून पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनीही या कल्पनेचे स्वागत केले आहे.