सातारा जिल्ह्यमध्ये करोना थमानाने लोकांमध्ये अस्वस्थता असून,  रुग्णसाखळी तुटता तुटेना त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या नेमक्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढून ती २०१ झाली आहे. अशातच टाळेबंदीसह र्निबधांमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे आता, परिस्थिती सावरण्याची जबाबदारी सर्वच घटकांवर येऊन ठेपली आहे. परंतु, अशिक्षित जनता, बेजबाबदार वर्तन अंगवळणी पडलेले लोक सध्याच्या संकटात सजगपणे वागतील का? हेच महत्त्वाचे ठरणार आहे.

आज शुक्रवारचा दिवस उजाडताच जिल्ह्यत नवे २० रुग्ण निष्पन्न होताना करोनाबाधितांची एकूण संख्या २०१ वर पोहोचल्याच्या वृत्ताने खळबळ उडवून दिली. करोना विषाणूच्या प्रचंड फैलावाने गेल्या ५५ दिवसांपासून समाजमन कुलूपबंद होते. गेल्या ८-१० दिवसात तर हा संसर्ग वेगाने वाढला आहे. हजारो लोक गृहविलगीकरणात, शेकडोजण संशयित म्हणून संस्थात्मक विलगीकरणात सध्या आहेत.  करोनाबाधितांची संख्या आठवडय़ाभरात धक्कादायकरीत्या वाढत गेली. आजमितीला सातारा जिल्ह्यतील प्रत्येक तालुक्यात करोनाग्रस्त निष्पन्न झाले आहेत. करोनाच्या भीतीपोटी मूळ गावाची ओढ लागून मुंबई-पुण्यासह बाहेरून सुमारे ४ लाखांवर लोक जिल्ह्यत आले आहेत. त्यांची लक्षणे, नोंदी, चाचण्या, वावर याची माहिती मिळवणे हे प्रशासनासमोरील दिव्यच ठरले आहे. विशेष म्हणजे कृष्णाकाठचा सधनपट्टा असलेल्या कराड तालुक्यातच जिल्ह्यतील करोनाचे दोन तृतीयांश रुग्ण मिळून आल्याने येथील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यादरम्यान नेमके काय करत होते आणि या दुरवस्थेचे धनी कोण? ही परिस्थिती कशी अटोक्यात येणार हा प्रश्न गंभीर बनला आहे. कृष्णाकाठी अर्धा डझनभर प्रतिष्ठित नेते असतानाही प्रशासनावर कुणाचाच अंकुश नसल्याचे चित्र दिसून येते आहे.

जिल्ह्यतील एकूण निष्पन्न २०१ रुग्णांपैकी कराडसह तालुक्यातील सुमारे २५ गावात १२० रुग्ण निष्पन्न झाले आहेत. कराड तालुक्यातील करोनाचा वाढता फैलाव येथील बाजारपेठेवर तसेच शिक्षण, अर्थकारण यावरही विपरीत परिणाम करणारा आहे. सातारा जिल्ह्यत प्रमुख शहरांभोवतीही करोनाचा विळखा आहे. निष्पन्न रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण उपचारांती घरी परतले, तर चार रुग्ण दगावले असून, दिवसागणिक रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढतच आहे. या पाश्र्वभूमीवर जनताजनार्दन हवालदिल असताना यंत्रणेचा बारकाव्याने परिस्थितीवर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न अपयशी ठरत आहे आणि अशा गंभीर व प्रतिकूल परिस्थितीत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्यत्र र्निबध सैलावल्याने आता, करोना संसर्गाला अटकाव करून या महामारीवर मात करण्याची जबाबदारी प्रामुख्याने लोकांनाच पार पाडावी लागेल. त्यात दक्षता, संवेदनशीलता, संयम या बाबी कशा पाळल्या जातात त्यावर या विभागाचे उद्याचे भविष्य ठरेल.