राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई,पुणे पाठोपाठ अन्य शहारांमध्ये देखील करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. सोलापुरात आज करोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर पाच नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

आज सकाळी आठ वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार काल रात्रभरात करोनाबाधित पाच नवे रूग्ण आढळून आले तर, दोघांचा मृत्यू झाला. एकूण रूग्णसंख्या आता ४६१ वर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडाही ३० झाला आहे.  आज करोनाशी संबंधित १२६ चाचणी अहवाल आले असता, त्यात आढळलेल्या नव्या पाच रूग्णांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. एक पुरूष व एक महिला अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. १६८ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

करोना विषाणुच्या वाढत्या फैलावामुळे भयग्रस्त झालेल्या सोलापुरात मंगळवारी २१ रूग्णांची नव्याने भर पडली. यात एका मृताचा समावेश आहे.  सोलापुरात करोना महामारीचे संकट चांगलेच घोंगावू लागले असून रुग्णसंख्याही वरचेवर वाढतच असल्यामुळे सोलापूरकर चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापूरला ‘रेड झोन’ घोषित करून कठोर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शहरातील करोनाबाधित ठरलेल्या एकूण ८६ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. यातून शहराची परिस्थिती बिकट होताना दिसून येते.