साक्री तालुक्यातील राहुड येथील शासकीय आश्रमशाळेच्या दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी आश्रमशाळेचे व्यवस्थापक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने पोलिसांची कुमक मागवावी लागली.
रविवारी बहुतेक विद्यार्थी कपडे धुण्यासाठी बाहेर जातात. तिसरीचा विद्यार्थी मनोज पंडित चौरे (९ वर्षे, रा. मचमाळ ता. साक्री) आणि चौथीतील सिद्धांत जगन्नाथ कडवे (१०, वाल्वे, ता. साक्री) हे दोघे रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत आढळून न आल्याने त्यांचा शोध घेणे सुरू झाले. शाळेचे रखवालदार एस. के. जावरे, पी. बी. गवळे, जे. के. पवार यांना विहिरीत विद्यार्थ्यांचे कपडे आढळले. विहिरीत तरंगणारे कपडे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळले. विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास येताच खळबळ उडाली. संतप्त ग्रामस्थांनी संबंधितांना निलंबित करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तहसीलदार सुभाष दळवी यांनी संतप्त ग्रामस्थांना शांत केले. आश्रमशाळेजवळ असलेली विहीर पडक्या अवस्थेत असून या संदर्भात अनेकांनी शाळा व्यवस्थापनाला धोक्याची जाणीव करून दिली होती. आश्रमशाळेचे व्यवस्थापक किंवा मुख्याध्यापक नेहमी गैरहजर असतात, अशीही ग्रामस्थांची ओरड आहे. यापूर्वीही आश्रमशाळेच्या एका विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने आश्रमशाळा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा चव्हाटय़ावर आला आहे.