सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपाच्या उदयनराजे भोसलांचा दारूण पराभव केला. विजयानंतर श्रीनिवास पाटील यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उदयनराजेंचा पराभवाचे कारण सांगितले. ते म्हणाले की, पक्षांतर लोकांना रूचले नाही त्यामुळे त्यांचा पराभव झाला.
विकासाची कामे करण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे उदयनराजे यांनी जनतेला सांगितले. पण त्यांच्या पक्षांतराचे हे कारण नव्हतेच. जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांनी कामं केली नाही. सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता आणि तो मतपेटीतून निघाला.
उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून कामं केली असती तर त्यांना यापेक्षाही मोठी संधी मिळाली असती. संधीच्या शोधात पक्षांतर करणं हे कदाचित लोकांना आवडलं नाही. त्यांनी आता लोकांमध्ये जावं, त्यांचा विश्वास परत मिळवावा. तरुणांना सोबत घेऊन मोठे कारखाने आणून रोजगार दिला आणि शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळवून दिला. तर त्यांचं नेतृत्व आणखी बराच काळ चालेल.