वाई : साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या घरालगतच्या भिंतीवर काढण्यात आलेले खासदार उदयनराजेंचे तैलचित्र लोकसभा निवडणुकीत दगा फटका बसू नये म्हणून पुसून नुकसान टाळण्याचा (‘डॅमेज कंट्रोल’)चा प्रयत्न करण्यात आला .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा शहरात मध्यवस्तीत पोवई नाक्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे घर आहे. या घराच्या बाजूलाच असलेल्या उदयनराजेंच्या मालकीच्या मोठ्या इमारतीच्या भिंतीवर खासदार उदयनराजेंच्या प्रेमापोटी एका चित्रकाराने भव्य तैलचित्र रेखाटले होते. तैलचित्र काढण्याच्या वेळेपासूनच याबाबत वाद निर्माण झाला होता. मात्र त्यावेळी देसाईंनी दोन पावले मागे घेतल्याने चित्र पूर्ण होऊ शकले. पण दररोज घरातून पाऊल बाहेर पडताच देसाई यांना ते चित्र पहावे लागत होते.

आणखी वाचा-सातारा: भ्रष्टाचार केला असता तर केव्हाच भाजपमध्ये गेलो असतो- शशिकांत शिंदे

याचा हिशेब करण्याचा मोका लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देसाई गटाने उघडपणे साधला. उदयनराजेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. मात्र पाटण तालुक्यात त्यांनी घेतलेल्या मेळाव्यास देसाई गटाला डावलल्याचे निमित्त पुढे करण्यात आले. उदयनराजे यांना अडचणीची ठरेल अशी एक पोस्ट समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात फिरली (व्हायरल). त्या पोस्टमध्ये शंभूराज देसाई यांच्या घराबाहेरील उदयनराजेंचे भव्य तैलचित्र तसेच साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाला सुरुवातीला झालेला विरोध याचा उल्लेख आहे. ही पोस्ट कोणी सोडली याचा तपास लागला नाही मात्र चित्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

आणखी वाचा-सांगली: मविआतील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी दबावाचे राजकारण

या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंच्या घराबाहेरील भिंतीवरील चित्र रातोरात पुसण्यात आले. निवडणुकीमुळे हे चित्र आचारसंहिता लागू होताच पडदा टाकून झाकून ठेवले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर या तैलचित्राचा मुद्दा उपस्थित झाल्यावर हे तैलचित्र रातोरात पांढऱ्या रंगाने पुसून टाकल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल सातारकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. निवडणुकीत समाज माध्यमावरील हा मुद्दा प्रतिकूल ठरेल असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाल्याने चित्र पुसल्याची चर्चा आहे. हा सर्व महायुतीतलाच विसंवाद असला तरी त्याचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून ही काळजी घेतली गेली असल्याचे दिसते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosles oil painting was wiped off at night to avoid conflagration mrj