शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्योतिषाकडे जाऊन भविष्य पाहण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोले लगावले आहेत. “त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही, कारण त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले आहेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. ते शनिवारी (२६ नोव्हेंबर) बुलढाण्यातील चिखली येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “काही जण ४० रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत. हे रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं. मी मुख्यमंत्री झाल्यावर शिवतीर्थावरच शपथ घेतली आणि पहिल्यांदा आमची कुलस्वामिनी एकविरा आईच्या दर्शनला गेलो. त्यानंतर मी अयोध्येला गेलो होतो.”

“त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही”

“हे आज तिकडे गुवाहटीला नवस फेडायला गेले आहेत. गेल्या आठवड्यात स्वतःचा हात दाखवायला गेले होते. म्हणजे ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो आपलं भविष्य ठरवणार आहे. त्यांची हातसफाई आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही. कारण त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं आणि…”

“दिल्लीत बसलेलेच त्यांचे मायबाप आहेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं आणि हे सांगतात हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून गेले,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोले लगावले.

व्हिडीओ पाहा :

“ते जुने चेहरे फसवे होते, गद्दार निघाले”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आज बुलढाण्यात आल्यावर काही जुने चेहरे दिसत नाहीये. मात्र, ते जुने चेहरे फसवे होते, गद्दार निघाले. त्यांना वाटलं हा बुलढाणा म्हणजे त्यांची मालमत्ता आहे. हे इकडे जमलेले मर्द मावळे हेच धगधगत्या मशाली आहेत. या पेटत्या मशाली अन्याय जाळायला निघाल्या आहेत.”

“मला कापलं तरी तुमच्याबरोबर येणार नाही”

“आपलं सरकार चांगलं चाललं होतं, पण आपलं सरकार पाडलं गेलं. नितीन देशमुखांनाही दे गुवाहाटीला घेऊन गेले होते, पण त्यांनी सांगितलं की, तुम्ही मला कापलं तरी तुमच्याबरोबर येणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणूनच राहणार आहे. नितीन देशमुख परत आले,” असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं. तसेच आज सगळे तिकडे गेलेत, ‘काय झाडी, काय डोंगर, सगळं ओक्के’, असं म्हणत शिंदे गटाला टोला लगावला.

हेही वाचा : “ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर…”, जिजाऊंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांना आशीर्वाद घ्यायला गुवाहटीला जाण्याची गरज लागली, मी…”

“त्यांना आशीर्वाद घ्यायला गुवाहटीला जाण्याची गरज लागली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी जिजाऊंच्या जन्मस्थान असलेल्या बुलढाण्यात माझ्या माता-भगिणींचे आणि शेतकरी बांधवांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी पुन्हा नव्या दमाने आणि त्वेषाने उभा आहे. जिंकणार म्हणजे जिंकणारच. हा माझा आत्मविश्वास तुम्ही आहात,” असंही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.