राजापूर : बारसू, सोलगाव, गोवळ पंचक्रोशीतील स्थानिक भूमीपूत्रांनी उभारलेल्या रिफायनरी प्रकल्पविरोधी लढय़ात स्थानिकांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवाचे गोठणे येथे दिली. सोलगाव, बारसू, गोवळ पंचक्रोशीतील महिला ग्रामस्थांच्या वतीने देवाचे- गोठणे केरावळे येथे गुरुवारी आयोजित हळदी-कुंकू समारंभात अंधारे प्रमुख अतिथी  होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांकडून रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलनाविषयी आणि आंदोलन काळात पोलिसांकडून झालेल्या दमदाटीबाबत माहिती घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी शासनाचा खरपूस समाचार घेतला.

आपली जमीन आणि घर वाचवण्यासाठी लढणाऱ्या महिलांवर शासन काठय़ा चालवणार असेल तर मुख्यमंत्री एखाद्य प्रकल्पासाठी आपले घर आणि जागा सोडतील का? ते तसे करू शकत नाहीत तर या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तरी आपली जागा का सोडावी, असा सवाल अंधारे यांनी केला.  स्थानिक भूमीपुत्रांचा प्रकल्पाला विरोध असेल त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नेहमीच जनतेच्या बाजूने राहिली आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची कायमच तशी भूमिका राहिली आहे. त्यामुळे येथेही प्रकल्पग्रस्तांना संपूर्ण पाठिंबा दिला जाईल. निवडणुका आल्या की काही लोक येतील. तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रय करतील, आंदोलन मोडून काढण्याचा प्रय करतील, पैशाचे अमिष दाखवले जाईल. मात्र त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही अंधारे यांनी केले.

 रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार मिळेल या केवळ शासनाच्या अफवा आहेत. प्रकल्प झाल्यास येथील पर्यावरणाचा ऱ्हास होईलच शिवाय मुंबईप्रमाणेच कोकणही परप्रतीयांच्या हातात जाईल. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प अन्यत्र कोठेही करा, पण कोकणात नको, अशा शब्दात ऋता सामंत-आव्हाड यांनी या प्रकल्पाला विरोध केला. रत्नगिरी येथील आगाशे यांनी रत्नगिरी जिल्ह्यत बंद पडत चाललेले उद्योग वाचवण्यात येथील पालकमंत्र्यांना रस नाही, मात्र रिफायनरी पकल्पासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे, यामागे नेमके गौंडबंगाल काय, असा सवाल केला. रिफायनरीविरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, दिपक जोशी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.