नाशिकच्या डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यूतांडवप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसंच, औषध खरेदीत गैरव्यवहार होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, "औषधांचा तुटवडा राज्यभर आहे. मंत्री म्हणत आहेत की औषधं मुबलक आहेत, पण प्रत्यक्षात औषधांचा खडखडाट आहे. मग असा दावा करणारे हे नेमके मंत्री कोण आहेत? आरोग्य खातं विभागलं गेलं आहे. औषधांच्या मुबलकतेबाबत मंत्री दावा करत असताना दुसरीकडे चंद्रपूरच्या एका महिलेचा व्हिडीओ फिरत आहेत. औषधं बाहेरून आणण्यास सांगितलं असल्यांच ही महिला व्हिडीओत सांगत आहे. मग, पंतप्रधानांच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हा सगळा खर्च केला जाणार आहे का? या योजनांतून मदत कोणाला दिली जाते? ही बिलं खरी आहेत का? हा संशोधनाचा विषय आहे." CBI चौकशी करा ते पुढे म्हणाले की, "कोरोना काळात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. आज दुसरी कोणतीही साथ नाही, आज साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. आरोग्य खात्याचं पोस्टिंगचंही रेट कार्ड ठरवलं गेलंय असं कानावर येतंय. औषधं खरेदीसाठीही निविदा प्रक्रिया बंद होणार आहे. मग हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणार? निविदा प्रक्रिया बंद करून भ्रष्ट्राचाराचं दार उघडं केलं जातंय. आज सुद्धा जिथे जिथे औषधं खरेदी झालेली नाही तिकडे कोणाचे दलाल बसले आहेत का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे." गुजरातला जाण्यास पैसे, पण रुग्णांचे जीव वाचवण्यास नाही "मागे युती सरकारच्या काळात धरण फुटलं तेव्हा खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं असं सांगण्यात आलं. खेकड्यांच्या हातात कारभार गेला आहे का, ते भ्रष्टाचाराचं पाणी आपल्याकडे वळवत आहेत का? स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत, गुजरातमध्ये जाण्यास पैसे आहेत, सुरतमध्ये जाण्यास पैसे आहेत, गोव्यात जाऊन टेबलवर नाचायला पैसे आहेत, पण महाराष्ट्रातली रुग्णांचे जीव वाचवायला पैसे नाहीत", असंही ठाकरे म्हणाले. पदाधिकाऱ्यांना आवाहन भ्रष्ट कारभारामुळे लोकांचे बळी जायला लागले आहेत. ज्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचत आहेत, सर्वांना सांगतो आपल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात जाऊन डीन आणि डॉक्टरांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. औषधांचा पुरवठा होत नाही तो त्यांचा गुन्हा नाही. जोपर्यंत आमचं सरकार होतं, महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी रुग्णालयात किती साठा आहे, तो साठा आणि पुरवठा संगणकीय होत होतं, ही पद्धत आता चालू आहे का, नसेल तर कोणी बंद केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री तिथे का जात नाहीत? "मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं अतिरेक्यांसारखी पोलीस कारवाई झाली नाही, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, कोणीच जबाबदारी झाली. कळव्यातही बळी गेले, तिथेही मुख्यमंत्री फिरकले नाहीत. गणपतीच्या दिवसांत नागपूर बुडालं होतं तरी मुख्यमंत्री बॉलिवूडच्या सिनेतारकांसोबत फोटो काढण्यात व्यस्त होते. मग नागपूर वासियांच्या घरात गणपती नव्हते? आताही मुख्यमंत्री तिथे का जात नाहीत?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ती यंत्रणा नालायक कशी ठरेल? "करोना काळात जी यंत्रणा होती तीच आताही आहे. करोनात ज्यांनी माणसं वाचवली ती यंत्रणा आता नालायक कशी होऊ शकते? यांच धुसफूस सुरू आहे, मंत्रीपदे, पालकमंत्रीपदासाठी मारामारी सुरू आहे", अशी टीकाही त्यांनी केली.