हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला असून, शिवसेना उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (दि. १०), तर काँग्रेस उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारासाठी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची १५ एप्रिलला सभा होणार आहे. दरम्यान, वसमत येथे सेनेचे उपनेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेकडे माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा व समर्थकांनी पाठ फिरविली. यावरून मुंदडा यांचा रुसवा कायम असून ठाकरे यांच्या सभेच्या व्यासपीठावर ते जाणार की नाही, याचीही चर्चा होत आहे.
वानखेडे यांच्या प्रचारासाठी दिवाकर रावते, कदम, सुहास सामंत यांच्या वसमत, सेनगाव, औंढा, कळमनुरी आदी ठिकाणी जाहीर सभा झाल्या. या वेळी मुख्य वक्त्यांनी काँग्रेसवर महागाई, भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जोरदार टीका केली, तसेच मोदींच्या लाटेचा लाभ वानखेडे यांच्या विजयास निश्चितच होणार असल्याचा दावा केला. सातव यांच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, मंत्री फौजिया खान आदींनी कळमनुरी, वसमत, हदगाव आदी ठिकाणी सभा घेतल्या. भाजप-शिवसेनेवर या वेळी वक्त्यांनी जोरदार टीका केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची िहगोलीतील रामलीला मदानावर गुरुवारी सायंकाळी जाहीर सभा होईल. सभेची जय्यत तयारी सुरू आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची १५ एप्रिलला दुपारी १ वाजता तापडिया इस्टेट मदानावर जाहीर सभा होईल. सेनेचे उमेदवार वानखेडे, जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी वसमतचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा रुसवा काढण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रदीर्घ चर्चा केली. या बठकीनंतर मुंदडा आता प्रचाराला लागले, असे वृत्तही प्रसिद्ध झाले. मात्र त्यानंतर वसमतला आयोजित सेनेचे उपनेते रामदास कदम यांच्या जाहीर सभेकडे मुंदडा व समर्थक नगरसेवक, जि.प. सदस्यांनी पाठ फिरविली. साहजिकच सेनेच्या पुढाऱ्यांना मुंदडा यांचा रुसवा काढण्यात अपयश आल्याची चर्चा होत आहे. आता ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेच्या व्यासपीठावर मुंदडा हजेरी लावणार का? त्यांचा रुसवा दूर होणार का? याची चर्चा होत आहे.