परभणी मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ त्या-त्या पक्षाच्या उमेदवारांनी जोर लावला असून, उद्या (बुधवारी) शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची, तर राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्यासाठी गुरुवारी (दि. १०) सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची संयुक्त सभा होत आहे.
येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर दोन्ही सभा होणार असून आपापल्या सभा टोलेजंग करण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी कंबर कसली आहे. यापूर्वी उमेदवारीअर्ज दाखल करताना भांबळे व जाधव यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. भांबळे यांचा अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. सेनेच्या प्रचारार्थ पूर्वी आदेश बांदेकर यांचा रोड शो, तर लक्ष्मण वडले यांची जाहीर सभा झाली.
शरद पवार गुरुवारी येथे येत असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत हंडोरे, राजेश टोपे, फौजिया खान आदी उपस्थित राहणार आहेत. सभेपूर्वी सायंकाळी ५ वाजता पवार यांचे अॅड. प्रताप बांगर यांच्या निवासस्थानी आगमन होईल. साडेपाच वाजता अक्षदा मंगल कार्यालयात डॉक्टर, वकील, प्राध्यापक, व्यापारी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. सातच्या सुमारास स्टेडियम मदानावर त्यांची जाहीर सभा होईल. सभेनंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या निवासस्थानीही ते भेट देणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून अॅड. बांगर यांनी सेनेशी संपर्क तोडला आहे. अशा स्थितीत पवारांच्या बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून बांगर-पवार यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.