प्रथम आशिष आणि टेकराज ल्होत्से शिखर सर करणार होते. पण यातील टेकराजला वैद्यकीय समस्येमुळे चढाईतून माघार घ्यावी लागल्यावर आशिषने गुरुवारी एकटय़ाने ल्होत्से शिखर सर केले. दुसऱ्या गटात झिरपे, माळी, मोरे आणि हर्षे यांनीही बुधवारीच ‘एव्हरेस्ट’साठी अंतिम चढाईचा प्रयत्न केला होता. पण ताशी शंभर किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापुढे त्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागली.
‘साऊथ कोल’मधील त्यांच्या तळावरून काल रात्री या गटाने पुन्हा एव्हरेस्टवर चढाईचा निर्णय घेतला. पण एक दिवस लांबल्यामुळे त्यांच्याजवळील कृत्रिम प्राणवायूचा साठा कमी झाला होता. या पाश्र्वभूमीवर एकाने माघार घेतल्यास ही मोहीम पुढे चालू ठेवणे शक्य होते. अशा वेळी या मोहिमेचा नेता उमेश झिरपे याने स्वत: माघार घेत उर्वरित तिघांना शिखर सर करण्याची संधी दिली.
या तिघांनीही मागील वर्षीच्या एव्हरेस्ट मोहिमेत भाग घेतलेला होता. त्या वेळी त्यांचे यश थोडक्यात हुकले होते. यातील गणेश मोरे हा अभियंता असून जेसीबी कंपनीत नोकरी करतो, तर आनंद माळी आणि भूषण हर्षे हे दोघेही ‘आऊटडोअर एक्सपर्ट’ म्हणून काम करतात. या संपूर्ण मोहिमेत अजित ताटे आणि टेकराज अधिकारी यांनी ‘बेस कॅम्प’ सांभाळण्याचे काम केले.