एव्हरेस्टच्या अंतिम चढाईच्या वेळी आम्हा चौघांपैकी एकाने कॅम्प दोनवर जाणे आवश्यक होते. आमचा नेता उमेश झिरपे याने वैयक्तिक ध्येय बाजूला ठेवीत आम्हा तिघांना चढाई करण्यास प्रोत्साहन दिले, त्यामुळेच आमचे एव्हरेस्टचे स्वप्न साकार झाले असे गिरिप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक आनंद माळी, भूषण हर्षे व गणेश मोरे यांनी सांगितले.
साऊथ कोलवरील समीट कॅम्पवरून थेट संपर्क साधल्यानंतर या तीनही गिर्यारोहकांनी उमेशचे स्वप्न साकार झाले नाही ही आमच्या यशास लाभलेली दु:खद किनार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, बुधवारी रात्री आम्ही चौघेही अंतिम चढाई करणार होतो. मात्र त्यादिवशी प्रतिकुल वाऱ्यामुळे आम्हाला अंतिम चढाई एक दिवस पुढे ढकलावी लागली. समीट कॅम्पवर तीन दिवस काढावे लागणार हे लक्षात आल्यानंतर प्राणवायूचा एकूण साठा लक्षात घेऊन एका सदस्यास माघार घेणे अपरिहार्य आहे असे लक्षात आल्यानंतर उमेशने कॅम्प दोनवर परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही तीन सदस्यांनी गुरुवारी रात्री ८-३० वाजता चढाईस सुरुवात केली. आमच्या समवेत कामी शेर्पा सरदार, रेजी शेर्पा, नोरबू शेर्पा, दाकिबा शेर्पा व दावा शेर्पा हे होते. सुरुवातीस जोरदार वारे होते मात्र हळूहळू त्याची तीव्रता कमी झाली. आमच्या मोहिमेबरोबरच अन्य मोहिमांच्या गिर्यारोहकांनी अंतिम चढाईस सुरुवात केली. साधारणपणे त्यावेळी ४० गिर्यारोहक होते. बोचरी थंडी, अधून मधून होणारे खराब हवामान व त्यामुळे होणारी दमछाक अशा प्रतिकुल परिस्थितीत आम्ही सकाळी सहा वाजता हिलरी स्टेपपाशी पोहोचलो. सकाळी आठ वाजता आम्ही एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचलो. आजपर्यंत घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले होते.

एकाच मोहिमेत एव्हरेस्ट व ल्होत्से या दोन्ही शिखरांवर यशस्वी चढाई करणे ही खरोखरीच सर्वासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे.
– सुरेंद्र चव्हाण
(पहिला मराठी एव्हरेस्टवीर)
..
उत्कृष्ट नियोजन व सातत्यपूर्ण शारीरिक तंदुरुस्ती ठेवीत गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी कौतुकास्पद यश मिळविले आहे. आठ हजार मीटर उंचीवरील शिखराच्या मोहिमेत कृत्रिम प्राणवायूचा उपयोग करतानाही खूप दमछाक होते. या सदस्यांनी अतिशय संयम ठेवीत हे यश मिळविले.
– हृषिकेश यादव
(एव्हरेस्ट १९९८ मोहिमेचा नेता)
..
गिरिप्रेमीच्या सदस्यांचे यश मला प्रोत्साहन देणारे आहे. आशिष माने हा मला माझ्या मकालु मोहिमेकरिता सतत हवामानाची अद्यावत माहिती देत होता. त्याने ल्होत्सेवर केलेली यशस्वी चढाई प्रेरणादायक आहे.
– अर्जुन वाजपेयी
(सर्वात लहान एव्हरेस्टवीर)
..
वृत्तपत्रात एव्हरेस्ट मोहिमेत माझ्या पतीचा सहभाग आहे हे वाचल्यानंतरच मला कळाले. तोपर्यंत त्यांनी हा विषय घरी कधी  काढला नव्हता. आता त्यांचे यश पाहून खूप आनंद झाला आहे.
–  ज्योती मोरे
(गणेश मोरे याची पत्नी)
..
खूप अभिमानास्पद व आनंददायी वृत्त आहे. त्याच्या या यशाचे श्रेय गिरिप्रेमीमधील त्याच्या सहकाऱ्यांना आहे.
– शिवलिंगप्पा माळी
(आनंद माळी याचे वडील)
..
भूषणचे एव्हरेस्टचे स्वप्न गतवर्षी हुकले होते मात्र यंदा हे यश
मिळाल्यामुळे  समाधान वाटते.
– उदय हर्षे
(भूषण हर्षे याचे वडील)

आज खऱ्या अर्थाने मोहीम पूर्ण झाली
गतवर्षी भूषण, गणेश व आनंद यांचे एव्हरेस्टचे स्वप्न अपुरे राहिले होते. आज त्यांनी हे यश मिळविल्यानंतर खऱ्या अर्थाने गतवर्षी सुरू झालेली एव्हरेस्ट मोहीम पूर्ण झाल्याचे समाधान मला वाटत आहे. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा अन्य सहकाऱ्यांचे शिखराचे स्वप्न साकार झाले याचाच मला अधिक आनंद झाला आहे, असे उमेश झिरपे याने सांगितले.

ल्होत्सेचे यश अधिक महत्त्वाचे
एव्हरेस्टवर गतवर्षी यशस्वी चढाई केल्यामुळे ल्होत्से शिखरावर चढाई करण्याची मला खात्री होती मात्र संपूर्ण चढाईच्या वेळी अतिशय प्रतिकुल वारे होते. अंतिम चढाई खूप आव्हानात्मक होती. तरी शेवटपर्यंत हार मानायची नाही हेच ध्येय ठेवीत मी हे लक्ष्य साकार केले असे ल्होत्से शिखर जिंकणाऱ्या
आशिष माने याने सांगितले.