* अधिकाऱ्यांवर कामगार संघटनांचा दबाव
मारहाणीच्या प्रकारानंतरही नगर-पुणे मार्गावरील ढाब्यांवर एसटी महामंडळाचे चालक-वाहक अनधिकृतपणे गाडी थांबवतच आहेत. कर्मचारी संघटनांना घाबरून महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी चालक-वाहकांवर कसलीच कारवाई करीत नसल्याने ते बेजबाबदार झाले असल्याचे शिरूर तालुका प्रवासी संघाचे म्हणणे आहे.
एसटी महांडळाचे चालक शिरूरच्या पुढे काही ढाब्यांजवळ घेत असलेल्या अनधिकृत थांब्याच्या विरोधात शिरूर तालुका प्रवासी संघ गेले वर्षभर सातत्याने लढा देत आहे. मध्यंतरी प्रवासी संघाच्या सदस्यांना विराज नावाच्या ढाब्यावर मारहाण झाली. त्याविरोधात पोलीस फिर्याद झाल्यानंतरही गाडी थांबवण्याचे प्रकार बंद झालेले नाहीत. पूर्वी फक्त एकच असलेल्या ढाब्यांचे आता ४ ढाबे झाले असून नगरहून पुण्याला जाताना व पुण्याहून नगरला येताना हे ढाबे म्हणजे एसटीच्या गाडय़ांचे अनधिकृत थांबेच झाले असून याचा सर्वाधिक त्रास शिरूरच्या प्रवाशांना होत असल्याचे प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी सांगितले.
ढाब्यांवर गाडी थांबवायची म्हणून एसटीमध्ये शिरूरचे प्रवासीच घ्यायचे नाही, असा प्रकार सुरू झाल्यानंतर शिरूर तालुका प्रवासी संघाने याविरोधात आंदोलन सुरू केले. गेले वर्षभर सातत्याने या विरोधात ते संघर्ष करीत आहेत, मात्र एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तोंडदेखले आश्वासन मिळत आहे, ढाब्यांवर गाडी थांबण्याचे मात्र थांबत नाहीत असे बांडे म्हणाले. या संदर्भात संघाची बैठक होऊन त्यात आता एसटी महामंडळाच्या नगर व पुणे विभागीय नियंत्रकांच्या कार्यालयातच आंदोलन करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती बांडे यांनी दिली.
ढाबेचालकाकडून फुकट जेवण मिळते, काही पैसे मिळतात म्हणून प्रवाशांना वेठीला धरण्याचा हा प्रकार निंदनीय तर आहेच, शिवाय धोकादायक आहे. नगरचे सामाजिक कार्यकर्ते, छायाचित्रकार दत्ता खोजे यांनीही मध्यंतरी याविरोधात आवाज उठवला होता, त्यांनी तसेच नगरच्या अन्य प्रवाशांनी शिरूर तालुका प्रवासी संघाला साथ द्यावी असे आवाहन केले. एका ढाब्याचे आता ४ ढाबे झाले आहेत, त्या अनुषंगाने गैरप्रकार वाढू लागले आहेत. तरीही महामंडळाला जाग यायला तयार नाही, त्यामुळे आता पुणे व नगरच्या विभागीय कार्यालयात आंदोलन करून नंतर थेट मुंबईतच परिवहनमंत्री गुलाबराव देवकर, महामंडळ अध्यक्ष जीवन गोरे, महाव्यवस्थापक दीपक कपूर यांनाच घेराव घालण्यात येईल असा इशारा बांडे यांनी दिला.