scorecardresearch

‘जामिनावर सुटका हवी असेल तर तीन कोटी द्या,’ नवाब मलिक यांच्या पुत्राला निनावी मेल, गुन्हा दाखल

या तक्रारीबाबत बोलताना अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे

Nawab Malik reaction after the High Court rejected the petition
नवाब मलिक (संग्रहित छायाचित्र)

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांच्या आर्थिक गैरव्यवहराच्या आरोपाखाली संक्तवसुली संचालनालयाने अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना अटक केलेले आहे. या अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापले असून मागिल काही दिवसांपासून महाविकास आघाडी तसेच भाजपा यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. असे असताना आता नवाब मलिक यांची जामिनावर सुटका हवी असेल तर बिटकॉईनच्या माध्यमातून तीन कोटी रुपये द्या, अशी मागणी करणारा एक मेल मलिक यांचा मुलगा आमिर मलिक यांना आला आहे. या मेलनंतर आमिर मलिक यांनी व्ही. बी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचे वृत्त द फ्री पेसने दिले आहे.

आमिर मलिक यांना आलेल्या मेलमध्ये काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार नवाब मलिक यांचे पुत्र आमिर मलिक यांना एक निनावी मेल आला आहे. या मेलमध्ये नवाब मलिक यांची जामिनावर सुटका हवी असल्यास तीन कोटी रुपये बिटकॉईनच्या माध्यमातून देण्याची मागणी करण्यात आलीय. याबाबत आमिर मलिक यांनी जास्त बोलण्यास नकार दिला आहे. “मला आलेल्या मेलबाबत मी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र ही गोपनीय बाब असल्यामुळे मी अधिक माहिती देऊ शकत नाही,” असं आमिर यांनी म्हटलंय.

विविध कलामांतर्गत पोलिसांनी नोंदवला गुन्हा

तर या तक्रारीबाबत बोलताना अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. “भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत आम्ही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम ४१९, कलम ४२० म्हणजेच फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या कलमांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आलाय,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

मलिक यांची याचिका फेटाळली

दरम्यान, नवाब मलिक यांना २३ फेब्रवारी २०२२ रोजी ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आठ तास चौकशी करुन अटक केली. त्यानंतर अटक चुकीची असल्याचा दावा करत मलिक यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांची अटक योग्य असून सुटकेचे अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. तसेच या याचिकेवर तपशीलवार सुनावणी आवश्यक असल्याचं नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unknown man demands 3 cr rupees in bitcoins for nawab malik release case filed by aamir malik prd