Premium

अवकाळीने अवकळा; पांढरे सोने काळवंडण्याची भीती

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला तडाखा; हजारो हेक्टरवरील पिकांची अतोनात हानि

Unseasonal rains hit Vidarbha Marathwada North Maharashtra
अवकाळीने अवकळा; पांढरे सोने काळवंडण्याची भीती

पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर : राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. त्यात फळांच्या बागा, रब्बी पिके, भाजीपाला, कापूस, तूर, भात आदींची प्रचंड हानी झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून या अस्मानी संकटामुळे राज्यभर हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आग्नेयकडून आलेले बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून आलेल्या थंड वाऱ्याच्या संयोगातून राज्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात गारपिटीचा इशारा दिला होता, मात्र तेवढ्या मोठ्या क्षेत्रावर गारपीट झाली नाही. गारपीट झालेल्या पुणे, नगर, नाशिकमध्ये फळपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. द्राक्षांच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. झाडाला पान, फळ राहिले नाही. केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे मोडून पडल्या आहेत. गारांचा मारा बसल्यामुळे पपई फळे खराब झाली आहेत. डाळिंबही हातचे गेले आहे. काढलेला कांदा आणि लागवड केलेला कांदा गारांच्या तडाख्याने खराब झाला आहे. गारपीट झालेल्या भागात सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे भाजीपाला आणि मळणी केलेल्या भाताचे नुकसान झाले. आगामी रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली. गारपीट झालेल्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांत फळे, रब्बी पिके आणि भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळीने मराठवाडा आणि विदर्भात वेचणीला आलेला कापूस, काढणीला आलेली तूर त्याचबरोबर भाताच्या पिकाची नासधूस केली. मात्र, अपुऱ्या पावसामुळे अडचणीत आलेल्या रब्बी हंगामातील पिकांना मात्र पावसाने दिलासा दिला आहे.

अवकाळी पावसाचा जोर विदर्भ, मराठवाड्यात जास्त होता. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. या जिल्ह्यांत वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. त्यामुळे पांढरे सोने काळवंडण्याचा धोका आहे. मराठवाडा आणि विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असल्यामुळे नुकसानीची तीव्रता जास्त आहे. कापसासह काढणीला आलेली तूर पावसात भिजल्यामुळे दर्जा घसरण्याची शक्यता आहे. विदर्भ, पश्चिम घाट आणि किनारपट्टीवरील काढलेले आणि झोडणी सुरू असलेले भातपीक भिजले आहे.

हेही वाचा >>>राज्य मागासवर्ग आयोगाची शुक्रवारी पुण्यात बैठक

हेही वाचा >>>

पावसाची नोंद

राज्यात रविवारी मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर होता. विदर्भातील अकोल्यात ४१.८, अमरावतीत २३.४, बुलडाण्यात ६१, वाशिममध्ये ६६ आणि यवतमाळमध्ये २९ मिमी पाऊस पडला. मराठवाड्यातील परभणीत ७६.६, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५४.४ आणि बीडमध्ये ४९.६ मिमी पाऊस पडला. उत्तर महाराष्ट्रातील जळगावात ३६, नाशिकमध्ये २९.१ मिमी पाऊस झाला. पुण्यात ५.१, डहाणूत १८.३ आणि कुलाब्यात ६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भ: कापूस, तुरीला फटका

नागपूर : बुलढाणा, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांत अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, तूर पिकासह रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात मिळून २६ मेंढ्या दगावल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर: ज्वारी आडवी

मराठवाड्याच्या चार जिल्ह्यांतील १०७ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने मोसंबी, डाळिंब, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे झाडे उन्मळून पडली. तर कापूस भिजला आणि ज्वारी आडवी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यात रात्री वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. गोठ्यांवरील पत्रे कोसळल्याने आणि विजा पडल्याने ७९ हून अधिक जनावरे दगावली आहेत. तूर, हरभरा पिकांना मात्र हा पाऊस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.

नाशिक: ३३ हजार हेक्टरवरील पिके बाधित

अवकाळी पाऊस, गारपिटीत जिल्ह्याच्या १३ तालुक्यांतील सुमारे ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका द्राक्ष आणि कांद्याला बसला. काही भागांत पूर्णत: नुकसान झाल्यामुळे बागा तोडून वर्षभर उत्पन्नाविना सांभाळण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. येऊ घातलेल्या नव्या लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होऊन दर कमी होण्याची शक्यता धूसर होणार आहे.

नगर: १५ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

●गारपीटीसह झालेल्या वादळी पावसाने पाच तालुक्यांतील १०७ गावे बाधित, घरांची पडझड, जनावरेही दगावली.

●१५ हजार ३०७ शेतकऱ्यांचे ८,३७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान.

●अकोले आणि पारनेर तालुक्यांत गारपिटीने सर्वाधिक नुकसान.

पालघरमध्ये भातशेतीचे नुकसान

रविवार, सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले. वसई, पालघरमध्ये भातकापणीचे काम अंतिम टप्प्यात आले होते. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापणी केलेले भाताचे भारे भिजले. पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर बुरशीजन्य रोग पसरण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unseasonal rains hit vidarbha marathwada north maharashtra amy

First published on: 28-11-2023 at 05:46 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा