जात, भेद व पंथ बाजूला ठेवून योग्य विचार घेऊन साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना अजूनही समाजातील अनेक घटकांपर्यंत शिक्षण व इतर सुविधा पोहोचलेल्या नसल्याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित यांनी खंत व्यक्त केली.
नाशिक रोड येथील चांडक बिटको महाविद्यालयात ‘फुले-आंबेडकर वादाचा जागतिक समकालीन साहित्यावरील प्रभाव’ या विषयावर आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर दिल्ली येथील अखिल भारतीय जनजाती परिसंघाचे अध्यक्ष डॉ. उदित राज, पुणे विद्यापीठाचे डॉ. मनोहर जाधव, विभागीय सचिव प्राचार्य बी. देवराज, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, साहित्यिक राजा ढाले, मुंबई येथील भटक्या विमुक्त चळवळीचे नेते लक्ष्मण गायकवाड, हॉर्वर्ड  विद्यापीठाचे ख्रिस्तोफर क्वीन, परिषदेच्या संयोजिका प्रा. डॉ. इंदिरा आठवले, सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. इंदिरा आठवले यांनी एकूण पाच तांत्रिक सत्रांत ७० तज्ज्ञ प्राध्यापकांनी पेपर प्रबंध सादर केल्याची माहिती दिली.
लक्ष्मण गायकवाड यांनी फुले-आंबेडकर यांचे विचार म्हणजे वाहत्या पाण्याचा झरा, असे नमूद केले. जाती व्यवस्था नष्ट करणे ही देशाची खरी गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. उदित राज यांनी जगाची पुनर्रचना करणे हा धम्माचा मूळ उद्देश असल्याचे सांगितले. सकाळच्या सत्रात ‘फुले-आंबेडकरवादी साहित्याने दिलेली वाङ्मयीन व जीवनवादी समीक्षा मूल्ये’ या विषयावर प्राध्यापकांनी प्रबंध सादर केले. सूत्रसंचालन प्रा. विजया धनेश्वर व शायोक्ती तलवार यांनी केले. या प्रसंगी ख्रिस्तोफर क्वीन, विभागीय सचिव प्राचार्य बी. देवराज, मुकुंद कोकीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. घनश्याम बाविस्कर, प्रा. सोनकांबळे, प्रा. डॉ. चित्रा म्हाळस यांनी पाच तांत्रिक सत्रांचा अहवाल सादर केला.