निसर्गसौंदर्य कुंचल्याने चित्रबद्ध करणारे येथील ज्येष्ठ चित्रकार शिवाजी रघुनाथ तुपे (७८) यांचे गुरुवारी पहाटे अर्धागवायूने निधन झाले. जलरंग माध्यमातील पारदर्शक रंग, अपारदर्शक रंग तसेच ‘अॅक्रेलिक’ व तैलरंग आदींचा समर्थपणे वापर करत तुपे यांनी आजवर साडेचार हजारहून अधिक चित्रकृतींचा ठेवा निर्माण केला. तुपे यांच्या पश्चात भाऊ, तीन बहिणी, भावजय व पुतणे असा परिवार आहे. मागील आठवडय़ात तुपे यांना अर्धागवायूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सिन्नर तालुक्यात जन्मलेल्या तुपे यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या जु. स. रुंगटा विद्यालयात तर कला शिक्षण मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये झाले. पाच दशके कै. एस. एल. हळदणकरांची जलरंग माध्यमाची परंपरा समर्थपणे पुढे नेत तुपे यांनी सृजनशील कलानिर्मिती केली. ‘बोधचित्रकार’ म्हणून कारकीर्दीला सुरुवात केल्यावर पुढील काळात संपूर्ण आयुष्य त्यांनी निसर्गचित्रणास वाहून घेतले. प्रत्यक्ष चित्रणासाठी देशभरात भ्रमंती करून साडेचार ते पाच हजार निसर्ग चित्रे रेखाटली. जहांगीर कलादालनासह देशातील विविध शहरांत व्यक्तिगत व समूह गटात ३० हून अधिक चित्र प्रदर्शनांत त्यांनी सहभाग नोंदविला. ललित कला अकादमी, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया, बिर्ला अकॅडमी ऑफ आर्ट अॅण्ड कल्चर अशा विविध संस्थांसह देश व परदेशातील अनेक रसिकांच्या संग्रहात त्यांची चित्रे संग्रहित झाली. जहांगीर आर्ट गॅलरी, बॉम्बे आर्ट सोसायटी ऑफ इंडिया यांसह कुसुमाग्रज प्रतिष्ठान, लोकहितवादी मंडळ या संस्थांचे ते आजीव सदस्य होते. नाशिकच्या दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्षपदही भूषविले. दिल्लीस्थित ‘दि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल हेरिटेज’ संस्थेचे ते सदस्य होते. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2013 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ निसर्ग चित्रकार शिवाजी तुपे यांचे निधन
निसर्गसौंदर्य कुंचल्याने चित्रबद्ध करणारे येथील ज्येष्ठ चित्रकार शिवाजी रघुनाथ तुपे (७८) यांचे गुरुवारी पहाटे अर्धागवायूने निधन झाले
First published on: 09-08-2013 at 01:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran nature painter shivaji tupe pass away